कव्वालासह लाऊड स्पीकर चालक व वधू-पित्यासह अटक
भुसावळ- विनापरवानगी लग्नानिमित्त कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करणे वधू-पित्याच्या अंगाशी आले असून या प्रकरणी कव्वाली चालकासह लाऊड स्पीकर मालक व वधू पित्यासह चौघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. संशयीतांना ताब्यात घेऊन समजपत्र देऊन सोडण्यात आले. शहरातील पंधरा बंगला भागात रविवारी मध्यरात्री उशिरापर्यंत कव्वाली सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह उपनिरीक्षक निशीकांत जोशी, विकास सातदिवे, जयराम खोडपे, प्रशांत चव्हाण, युनूस तडवी, शशीकांत तायडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कव्वालीचा कार्यक्रम घेण्यासंदर्भात उभयंतांकडे कुठलीही परवानगी नव्हती शिवाय रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर सुरू असल्याने पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कव्वालासह चौघांना अटक
या प्रकरणी कव्वाल अंकुश साहेबराव हेसळे (बौद्ध विहारजवळ, कंडारी), राजकीय पदाधिकारी ईस्माईल बाबूखाण पठाण (कामगार कॉलनी, विमानतळाजवळ, चिखलठाणा, औरंगाबाद), लाऊडस्पीकर मालक सुनील बाबू सिंह (शिवपूर, कन्हाळा रोड, भुसावळ) व वधू पिता फारूक सुभान शेख (पंधरा बंगला, भुसावळ) यांना ताब्यात घेतल्यानंतर रात्री समजपत्र देऊन सोडण्यात आले. संशयीतांविरुद्ध गुरनं.3075, मुंबई पोलीस कायदा कलम 38 चे उल्लंघण 136 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.