भुसावळात विषय व स्थायी समिती सदस्यांची निवड

0

भुसावळ– नववर्षातील पालिकेची पहिलीच विषय व स्थायी समिती सदस्यांच्या निवडीची सभा गोपाळ नगरातील पालिकेच्या स्थलांतरीत कार्यालयात शांततेत पार पडली. सहा विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आली तसेच स्थायी समितीच्या तीन सदस्यांची प्रसंगी निवड करण्यात आली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा होणार असून त्यात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या वॉर्डाना अनुक्रमे 30, 20 व 15 हजारांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहितीत मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी दिली. शुक्रवारी सकाळी 11 वाजता झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी तहसीलदार विशाल नाईकवडे होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली उपस्थित होते. प्रत्येक समिती सत्ताधारी गटाचे दहा तर विरोधी जनधारच्या सहा सदस्यांना संधी देण्यात
आली आहे.

जनआधारचे रवी सपकाळे बसले सत्ताधारी गोटात
भीमा-कोरेगाव प्रकरणात चौकशीसाठी जनआधारचे नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनी बाजारपेठ पोलिसांनी पाच ते सहा तास बसवून ठेवल्यानंतरही त्यांच्या पक्षातील कुणीही नगरसेवक भेटायला व चौकशीसाठीदेखील न आल्याने सपकाळे यांनी शुक्रवारच्या सभेत सत्ताधारी गोटात बसणे पसंत केले. आपण मात्र जनआधारचेच असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कोरे-भीमा प्रकरणाच्या निषेधाचा ठरावाची त्यांनी सूचना मांडली मात्र नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही बैठक शासकीय असल्याचे सांगत आगामी सर्वसाधारण सभेत तो ठराव घेऊ, असे सांगितले.

नगरसेवक ठाकूर यांनी ठेवले अस्वच्छतेवर बोट
जनआधारचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी शिवाजी नगरासह जाम मोहल्ला भागातील अस्वच्छतेवर बोट ठेवले. लेंडीपूरा व दीनदयाल नगरात 30 हजार रुपये खर्चून उभारलेले शौचालय पालिकेने तोडले मात्र नवीन काम पूर्ण झाले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्या प्रभागात एकच स्वच्छता कर्मचारी नेमण्यात आला असून 10 हजार नागरीकांच्या भागात तो कसे काम करणार? असे सांगत कर्मचारीसंख्या वाढविण्याची त्यांनी विनंती केली मात्र मुख्याधिकार्‍यांनी आहे त्या कर्मचार्‍यांवर भागवा व काम करून घ्या, असा सल्ला दिला.