भुसावळ- शहरातील वसंत टॉकीज परिसरातील न्यायालयाच्या मागील भागात असलेल्या महावितरणच्या 100 केव्हीएच्या ट्रान्सफार्मरने रविवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या दरम्यान विजदाब वाढल्याने पेट घेतला. यामुळे न्यायालय फिडरवरील तब्बल अडीच हजार घरांचा विजपुरवठा पाऊस तास खंडीत झाला. शहरात गेल्या पंधरवड्यापासून पाऊस नसल्याने तापमान वाढले आहे, यातच विजेची मागणीही वाढली. यामुळे वीजउपकरणांमध्ये बिघाड होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी शहरातील वसंत टॉकीज परिसरातील न्यायालयाच्या मागील महावितरणचा ट्रान्सफार्मर अचानक पेटला. विजेचा दाब वाढल्याने या ट्रान्सफार्मरने पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या अग्नीशमन विभागाला संपर्क साधून माहिती दिली तर याच दरम्यान नागरिकांनी ट्रान्सफार्मरवर माती व वाळू टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. वीजपुरवठा खंडीत झाल्याने सुमारे 20 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले गेले. यामुळे न्यायालय फिडरवरील म्युनिसीपल पार्क, बद्री प्लॉट, कोर्टाच्या मागील भाग, राहूल नगर, श्रीकृष्ण व राम मंदिराचा परिसर आदी भागातील विजपुरवठा खंडीत झाला. तब्बल पाऊण तासाने वीजपुरवठा खंडीत सुरळीत झाला.
खंडीत वीजपुरवठ्याचा प्रश्न
शहरात गेल्या आठवड्यापासून वीजेची मागणी वाढली आहे. यामुळे वीज उपकरणांवरील दाब वाढून वारंवार बिघाड होण्याच्या घटना घडत आहेत. दररोज सर्वच भागातील विजपुरवठा दोन ते तीन तास खंडीत राहत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.