भुसावळात ‘वीज वितरण’ला दुरुस्तीच्या कामांचा विसर

जून महिन्याच्या प्रारंभानंतर मान्सूनपूर्व कामे प्रलंबित ; पावसाळ्यात नागरीकांना मोठा मनस्ताप

भुसावळ : पावसाळ्यात वादळी वार्‍यामुळे झाडांची पडझड होवून वीज तारा तुटून पडतात. यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. पुढील बिघाडी टाळण्यासाठी पावसाळ्याअगोदरच महावितरणतर्फे दुरुस्तीची कामे केली जातात मात्र आता जून महिना सुरू झाला तरीदेखील मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झालेली नाही. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने उर्जा मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

पावसाळापूर्व कामांना ‘खो’
जून महिन्याच्या प्रारंभानंतर मान्सूनपूर्व कामे प्रलंबित ; पावसाळ्यात नागरीकांना मोठा मनस्तापवीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फ्लेक्स बॅनर्स, प्लास्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो. याशिवाय सैल झालेले गार्डिंग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करणे अपेक्षित आहे. वीज रोहित्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे, रोहित्रांचे आर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर पिलर्स या सर्वांचे आर्थिंग सुस्थितीत करणे, फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इंसुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉईट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली, जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदल आदी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मे महिन्याच्या उत्तरार्धातच केली जावी, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनी केली होती.

थेट उर्जा मंत्र्यांकडे तक्रार
महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणार्‍या बदलाचा प्रतिकुल परीणाम वीज वितरण यंत्रणेवर होतो. पर्यायाने वीज पुरवठ्यात व्यत्यय येऊन सर्वसामान्य ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो म्हणून शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनी थेट ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे. दरवर्षीप्रमाणे भुसावळ शहरात मान्सून पूर्व कामांची सुरुवात जून महिन्यात केली जाते. अधिकारी आणि एजन्सी यांची मिलीभगत असल्याचा व पूर्ण दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप तक्रारी करण्यात आला आहे.