बाजारपेठेतील बाबा तुलसीदास मार्केटजवळील कुपनलिका दोन महिन्यांपासून होती बंद
भुसावळ- शहरातील बाबा तुलसीदास मार्केटजवळील सार्वजनिक कुपनलिकेतील पाण्याचा परीसरातील व्यापार्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतो मात्र ही कुपनलिका दोन महिन्यांपासून बंद पडल्याने व्यापार्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. याबाबत व्यापार्यांनी कुपनलिका दुरूस्तीसाठी पालिका प्रशासनाला साकडे घातले मात्र त्याचा काही एक उपयोग न झाल्याने परीसरातील व्यापार्यांनीच पुढाकार घेवून कुपनलीकेची स्वखर्चाने दुरूस्ती केल्याने पाण्याची अडचण मार्गी लागली.
19 वर्षांपूर्वीची सार्वजनिक कुवनलिका
शहराच्या मुख्य बाजारपेठेतील बाबा तुलसीदास मार्केटजवळ पालिका प्रशासनाच्या माध्यमातून 19 वर्षापूर्वी सार्वजनिक कुपनलिका तयार करण्यात आली आहे. या सार्वजनिक कुपनलिकेचा परीसरातील व्यापार्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत झाली आहे मात्र दोन महिन्यांपासून व्यापार्यांना दिलासा देणारी ही कुपनलिका बंद पडल्याने व्यापार्यांच्या अडचणीत भर पडली. याबाबत परीसरातील व्यापार्यांनी पालिका प्रशासनाकडे कुपनलिका दुरूस्त करण्याचे साकडे घातले. मात्र पालिका प्रशासनाने व्यापार्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. यामुळे परीसरातील व्यापार्यांनीच पुढाकार घेवून बंद पडलेली कुपनलिका स्वखर्चाने दुरूस्त करण्याचा निर्णय घेवून कुपनलिका दुरूस्त केली. यामुळे परीसरातील व्यापार्यांची पाण्याची अडचण दुर होण्यास मदत झाली.
दुरूस्तीसाठी यांनी घेतला पुढाकार
सार्वजनिक कुपनलिका दुरूस्तीसाठी विकास वाणी, गोपीचंद कमनानी, शीतल दर्डा, वाहेर अली, पटेल पेन्टर, सुलेमान भाई, राजकुमार वाधवानी, पानामल दुसेजा, देवसिंग भोळे आदींसह परीसरातील व्यापार्यांनी पुढाकार घेतला. कुपनलिका दुरूस्तीसाठी सात हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. यामुळे परीसरातील व्यापार्यांची पाण्याची समस्या मार्गी लागली.