भुसावळात शहर पोलिसांनी पकडलेला ‘तो’ तांदुळ रेशनचाच : चालकाविरोधात गुन्हा

भुसावळ शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडला नशिराबादजवळ रेशनचा तांदुळ : आरोपीला ट्रक चालकाला न्यायालयाने सुनावली कोठडी

भुसावळ : भुसावळ शहर पोलिसांना रेशनचा तांदुळ काळ्या बाजारात ट्रकद्वारे विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गस्ती पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून शनिवारी मध्यरात्री ट्रक पकडला होता. या प्रकरणी रविवारी रात्री ट्रक चालक ईयाराम शिकारीया डोडवे (24, सुल्याफल्या पखालिया, तहसील पाटी, जि.बडवानी) याच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसात ईसी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. आरोपीला भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, जप्त ट्रकमधील रेशनचा तांदुळ मुक्ताईनगर येथून भरल्याची माहिती ट्रक चालकाने दिली असून पोलिसांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे त्या व्यापार्‍याचा शोध सुरू केला आहे. स्वस्त धान्याचा काळाबाजार करणारे रॅकेट सक्रिय असून ते उघडकीस येण्याची अपेक्षा आता सुज्ञ नागरीक व्यक्त होत आहे.

गोपनीय माहितीवरून पकडला तांदुळ
भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी हवालदार विनोद नेवे, चालक हवालदार जाकीर अली सैय्यद हे शनिवारी रात्री गस्तीवर असताना त्याने बातमीदाराने रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक असल्याची टीप दिली होती. वाय पॉईंटवर संशयास्पद ट्रक (एम.एच.18 बी.ए.8737) हा अडवल्यानंतर न थांबता भरधाव वेगाने नशिराबादच्या दिशेने निघून गेल्याने पाठलाग करून पोलिसांनी नशिराबाद टोल नाक्याजवळील सम्राट टी सेंटरजवळ पकडला होता. ट्रकची पाहणी केल्यानंतर त्यात सुमारे 24 टन तांदुळ असल्याने चालकाला कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने ट्रक शहर पोलिसात आणण्यात आला होता.

जप्त तांदुळ रेशनचाच
शहर पोलिसांनी पकडलेला ट्रकमधील तांदुळ हा रेशनचा असल्याची कबुली अटकेतील ट्रक चालकाने दिल्यानंतर शहर पोलिसांनी पंचनामा केला व दोन लाख 40 हजार रुपये किंमतीचा तांदुळ व 14 लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त करण्यात आला. पुरवठा विभागाशी चर्चा केल्यानंतर या प्रकरणी रविवारी रात्री हवालदार विनोद नेवे यांच्या फिर्यादीनुसार ट्रक चालक ईयाराम शिकारीया डोडवे (24, सुल्याफल्या पखालिया, तहसील पाटी, जि.बडवानी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली मात्र सोमवारी न्यायालयात आरोपीला हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

जिल्हाधिकार्‍यांना पत्र देणार : पोलिस उपअधीक्षक
ट्रक चालक आरोपी न्यायालयीन कोठडीत गेला असलातरी तांत्रिक तपासाद्वारे आम्ही तांदळाच्या व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांपर्यंत पोहोचू शिवाय आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरवली जाईल, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले जाईल व पुरवठा विभागाच्या अहवालानंतर जप्त तांदळाबाबत पुढील निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.