भुसावळात शिक्षकाचे घर फोडले : लाखोंचा ऐवज लंपास

भुसावळ : शहरातील बी.झेड.हायस्कूलमधील शिक्षकाच्या बंद घरातून चोरट्यांनी लाखोंचा ऐवजावर डल्ला मारल्याची घटना बुधवार, 23 रोजी सकाळी उघडकीस आली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
घर बंद असल्याची चोरट्यांनी साधली संधी
खडका रोड वरील रॉकेल डेपोजवळील रहिवासी व शिक्षक शेख अल्ताफ शेख हुसेन हे आई आजारी असल्याने यावल येथे 22 रोजी कुटुंबासह गेल्याने घराला कुलूप होते. चोरट्यांनी कपाटातील आठ ग्रॅमचे मंगळसूत्र, अडीच ग्रॅमची अंगठी, तीन तोळ्याची बांगडी, 80 हजारांची रोकड तसेच दिड लाखांचा पीएफची रक्कम लांबवल्याचे शेख अल्ताफ हुसेन यांनी सांगितले. बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी पाहणी केली. या प्रकरणी गुरुवारी शेख अल्ताफ हुसेन यांच्या फिर्यादीनुसार 99 हजार 575 रुपये किंमतीचे मंगळसूत्र, बांगड्या व अंगठी चोरी झाल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक हरीष शंकर भोये करीत आहेत. दरम्यान, रोख रक्कम चोरी झाल्याबाबत फिर्यादीत उल्लेख करण्यात आला नसल्याचे शेख अल्ताफ हुसेन यांनी सांगितले.