भुसावळ- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा भुसावळातील मराठा समाजातर्फे निषेध करण्यात आला. खासदार संजय राऊत यांनी लवकरात लवकर माफी मागावी अथवा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्रांताधिकारी प्रशासनाला शुक्रवारी भुसावळात निवेदन देण्यात आले. राऊत यांच्यावर कारवाई न केल्यास मराठा समाजातर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
खासदार राऊतांनी माफी मागावी
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश उदयनराजे भोसले असल्यास या संदर्भात पुरावे द्यावे अश्या पध्दतीचे चुकीचे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपतीच्या वंशजांबद्दल असले वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मराठा समाजा तर्फे देण्यात आला. प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर मराठा समाजातर्फे निदर्शने करण्यात आले. यावेळी मराठा समाज तालुकाध्यक्ष किरण पाटील, रवींद्र लेकुरवाळे, राजू नाना आवटे, रवी ढगे, पंकज हिंगणे, भारत पाटील, सतीश उगले, पवन उगले, वसंत पाटील, विजय कलापुरे, आप्पा ठाकरे, नीलेश निमसे, छावा तालुकाध्यक्ष कृष्णा शिंदे, योगेश जाधव, राम गाडेकर आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.