भुसावळात शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकर्‍यांची तहसीलमध्ये गर्दी

0

भुसावळ- प्रत्येक पात्र शेतकर्‍यापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, गटसचिवांनी गावागावात जावून माहिती संकलित करण्याच्या सूचना प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केल्या आहेत. शनिवारी तहसील कार्यालयाला सुटी असलीतरी योजनेच्या लाभासाठी कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. याप्रसंगी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी प्रत्येक सजेसाठी नेमलेल्या ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांना सूचना केल्या तसेच कार्यालयात आलेल्या शेतकर्‍यांकडील आधारकार्डची नोंदणी करण्यात आली. योजनेत पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे. 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत पात्र लाभार्थींच्या यादीची प्रसिद्धी व दुरुस्ती, यानंतर 22 ते 26 फेब्रुवारीदरम्यान ही महाऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.