मध्यरात्री अडीच वाजता आगीवर नियंत्रण : 15 बंबांनी विझवली आग
भुसावळ- न्यू एरीया वॉर्डातील ब्राह्मण संघासमोरील राजलक्ष्मी पेंट या दुकानाला शॉर्ट सर्किटने मोठी आग लागल्याने सुमारे 50 लाखांवर रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री 10 वाजता घडली. भुसावळ पालिकेसह लगतच्या पालिकेच्या तब्बल 15 ते 17 बंबांनी पाण्याचा मारा केल्याने रात्री अडीच वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले मात्र तो पर्यंत तीन मजली पेंटच्या दुकानातील सर्व साहित्याचा कोळसा झाला होता.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय
ब्राह्मण संघासमोरच अर्जुनदास मेघानी यांच्या मालकिचे राजलक्ष्मी पेंट हे किरकोळ व होलसेल कलर विक्रीचे दुकान आहे. रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दुकानासमोरील इलेक्ट्रील पोलवर स्पार्किंग झाल्यानंतर मेघानी यांच्या दुकानाबाहेरील वीज मीटरमध्येही स्पार्किंग झाल्याने दुकानात आगीची ठिणगी पडली. दुकानात ऑईल पेंट, डिस्टेंपर, कार पेंट, थीनर आदी असल्याने आगीचा लागलीच भडका उडाला. पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतरही तब्बत अर्धा ते पाऊण तासाने बंब दाखल झाला मात्र तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
नगरसेवक पिंटू कोठारींसह नितीन धांडेची धाव
आगीची माहिती कळताच नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी व सामाजिक कार्यकर्तेे नितीन धांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व आहे त्या साधनांनी त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला तर कोठारी यांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली मात्र तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने बंब दाखल झाला तर रंग हे ज्वलनशील असल्याने पाहता-पाहता आगीचा विळखा खालच्या दुकानापासून तिसर्या मजल्यापर्यंत असलेल्या गोडावूनपर्यंत पोहोचला.
वीजपुरवठा खंडीत, 15 बंबांनी विझवली आग
वर्दळीच्या भागात लागलेल्या आगीनंतर तातडीने या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर लगतच्या मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह वाल्मीक नगर भागातील तरुणांनीही मदत कार्य केले. भुसावळ पालिकेकडे अवघे दोनच बंब असल्याने लगतच्या पालिकांनाही याबाबत माहिती कळवण्यात आल्यानंतर दीपनगरसह ऑर्डनन्स फॅक्टरी, यावल, फैजपूर, सावदा पालिकेच्या बंबांना पाचारण करण्यात आले. मुळातच गल्ली-बोळात दुकान असल्याने पालिकेचा बंब घटनास्थळी आणण्यात अनेक अडचणी येत होत्या मात्र अशाही परिस्थितीत रात्री अडीच वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने परीसरातील अनेक दुकानांना आगीची झळ बसली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
लोकप्रतिनिधींनी घेतली धाव
आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह शहरातील विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पालिकेकडे आधीच प्रशिक्षित कर्मचार्यांचा अभाव असल्याने नगराध्यक्षांनी कर्मचार्यांना आग विझवण्याबाबतही सूचना केल्या. पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार व कर्मचार्यांनी धाव घेतली.