भुसावळ : वीज मिटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शारदानगर भागातील प्रभुलिला अपार्टमेंटमध्ये घडली. या आगीत तब्बल 11 वीजमिटर जळून खाक झाले तर आगीची झळ अपार्टमेंट उभ्या असलेल्या दुचाकीलादेखील बसली आहे. आगीमुळे अपार्टमेंटचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. आगीनंतर परीसरातील रहिवाशांनी धाव घेवून वाळू व अग्निरोधक साधनांचा वापर करीत आगीवर नियंत्रण मिळवले. यानंतर पालिकेचा अग्निशमन बंबही बोलविण्यात आला. दरम्यान आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला अन्यथा आगीने रौद्ररुप धारण केले असते तर मोठी वित्तीय हानी होण्याचा धोका होता
अभियंत्यांनी केली पाहणी
महावितरणच्या उत्तर विभागाचे कनिष्ठ अभियंता रविंद्र पद्मे व कर्मचार्यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याबाबतचा अहवाल ते जळगाव मुख्यालयात पाठविणार आहेत. यानंतर आग का लागली, याची कारणमिमांसा होऊ शकेल.