भुसावळात शोभायात्रेतून संस्कृती व परंपरेचे दर्शन

0

जगतगुरू नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळाचा उपक्रम ; ढोल-ताशा पथकासह कलश व गुढीधारी महिलांचा सहभाग

भुसावळ- हिंदू नववर्षाचे औचित्य साधून जगतगुरू नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ जळगाव पूर्वच्या वतीने शहरातील देना नगरातील काशी विश्‍वनाथ मंदिरापासून शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ढोल-ताशा व हलगीच्या गजरात कलशधारी व गुढीधारी महिलांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेतून छत्रपती शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासीक प्रसंग सजीव देखाव्याद्वारे साकारण्यात आले तर ही शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शहरवासीयांनी गर्दी केली. आनंद नगर, जामनेर रोड, पांडुरंग टॉकीज, लोखंडी पुलमार्गे विठ्ठल वॉर्डातील विठ्ठल मंदिराजवळ ही शोभायात्रा पोहोचल्यानंतर तिचा समारोप करण्यात आला. सुमारे तीन तास ही शोभायात्रा चालली.

नवीन पिढीवर संस्कार रूजण्यासाठी उपक्रम
हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, नागरीकांनी एकत्र यावे, विविधतेतील एकतेचे दर्शन होण्यासाठी नव्या तरुण पिढीवर संस्कार रूजावेत या हेतूने जगतगुरू नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. जिल्हा सेवा निरीक्षक अमोल कुलकर्णी, जिल्हा सेवाध्यक्ष नामदेव बोरसे, संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय शुक्ला आदींच्या उपस्थितीत काकाडा आरती करण्यात आली. शोभायात्रेचे उद्घाटन मधुकर जावरे, सुनील पाटील, डिगंबर टोके, संजय महाजन, गोपाळ बारी, अशोक चौधरी, शारदा चौधरी, मनीषा नेले, अर्चना राजवैद्य, किशोर महाजन आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

सामाजिक उपक्रमांची माहिती
शोभायात्रेत हलगीसोबत ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. कलश व गुढीधारी महिलांसोबत चित्ररथ साकारण्यात आला होता. यात छत्रपती शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासीक प्रसंग, राम पंचायतन व सामाजिक जाणिवेबद्दल जागरूकता निर्माण करणार्‍या चित्ररथांचा समावेश होता. शोभायात्रेच्या माध्यमातून भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणार्‍या उपक्रमांची माहिती देण्यात आली तसेच विविध फलकांचाही शोभायात्रेत समावेश होता. जिल्हा सेवा भक्त मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले.