भुसावळात श्री विसर्जनादरम्यान नऊ वर्षीय बालिकेचा बुडाल्याने मृत्यू

भावाला वाचवण्यात यश : दिड दिवसांच्या गणरायाला निरोप देताना दुर्घटना

भुसावळ : दिड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण नयनांनी निरोप देत असताना नदीपात्रात पाय सटकल्याने नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला तर 11 वर्षीय भावाला वाचवण्यात यश आले. रविवार, 12 रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास झेटीएस स्मशानभूमी परीसरातील तापी नदीकाठाजवळ ही घटना घडली. या घटनेत अनन्या मनीष यादव (9) या चिमुकलीचा मृत्यू झाला. सुदैवाने चिमुकलीचा भाऊ आर्यनराज मनीष यादव (11) यास वाचवण्यात यश आले.

पाय सरकल्याने भावंड बुडाले
झेडटीएस परीसरातील रहिवासी तथा रेल्वेतील रेल्वे टीटी मनीष यादव यांची मुले आर्यनराज व अनन्यादेखील सोबत होती. गणरायाचे विसर्जन करताना पाय निसटल्याने दोघे भावंडे पाण्यात पडली. ही घटना पाहताच संत गाडगेबाबा हायस्कूलचे शिक्षक पाचपांडे यांनी पाण्यात उडी घेतली. यावेळी आर्यनराज यास वाचवण्यात यश आले मात्र अनन्या पाण्याचा प्रवाहात वाहून गेली. दुपारच्या सुमारास अनन्याचा मृतदेह सापडला. मृतीचा मृतदेह पाहताच कुटुंबाने टाहो फोडला. या घटनेने या परीसरात मोठी खळबळ उडाली. यावेळी कंडारी पोलीस पाटील रामा यादव घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. भुसावळ तालुका पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.