भुसावळात संचारबंदीचा गैरफायदा घेत व्यापार्‍यांकडून लूट

0

जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई करण्याची मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रची मागणी

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर संचारबंदी जाहीर करण्यात आली असून जीवनावश्यक वस्तूंना मोठी मागणी वाढली असतानाच काही व्यापारी मालाची साठेबाजी करून वाढीव दरांची जीवनावश्यक वस्तूंची विक्री करून ग्राहकांची लूट करीत असल्याची तक्रार ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्र.ह.दलाल यांनी केली आहे.

तेलाच्या किंमतीत वाढ
दलाल यांच्या तक्रारीनुसार, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक किराणा, धान्य खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत त्यामुळे या परीस्थितीचा गैरफायदा काही व्यापारी घेत आहेत. अनेक किराणा वस्तूंची किंमत अचानक वाढली आहे. काल जो खाद्य तेलाचा डबा एक हजार 500 रुपये किमतीचा होता तोच डबा आज एक हजार 530 रुपयांना विकला जातो आहे. हे केवळ उदाहरण आहे. अश्या पद्धतीने अनेक वस्तूंचे भाव वाढले आहेत. तर साठेबाजी, काळाबाजार कृत्रिम टंचाई असे गैरप्रकार वाढले आहेत. अश्यावेळी शासनाने अश्या समाजद्रोही नफेखोरी करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या जळगाव जिल्हा अध्यक्ष प्र.ह.दलाल भुसावळ यांनी केले केली आहे.