भुसावळात संतप्त रेल्वे प्रवाशांनी सचखंड रोखली

0

शौचालयातील अस्वच्छतेमुळे प्रवासी संतप्त : प्रशासनाचे दुर्लक्ष

भुसावळ : रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शौचालय तुंबल्याने संतप्त रेल्वे प्रवाशांनी भुसावळात अप सचखंड रोखल्याची घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजता घडली. स्वच्छता होत नाही तो पर्यंत गाडी पुढे जावू न देण्याचा पवित्रा रेल्वे प्रवाशांनी घेतल्याने दोन तास गाडी भुसावळात थांबून होती. अखेर किरकोळ स्वच्छता केल्यानंतर गाडी जळगावकडे मार्गस्थ झाली.

दुर्गंधी पसरल्याने प्रवासी संतप्त
12716 अप अमृतसर-हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस रविवार, 15 रोजी पहाटे साडेपाच वाजता अमृतसर स्थानकावरुन निघाली. या गाडीची दुपारी दीड वाजता दिल्ली स्थानकावर साफसफाई होणे अपेक्षित होते मात्र दिल्ली स्थानकावर कोच क्रमांक ए- 1 बी- 1 ते बी- 4 अशा पाचही वातानुकूलित कोचमध्ये स्वच्छता झाली नाही. यामुळे एसीच्या पाचही कोचमध्ये अस्वच्छता वाढली. दरम्यान यानंतर दिल्लीत स्वच्छतेची मागणी केल्यानंतर प्रवाशांना आग्रा स्थानकावर स्वच्छता होईल, असे सांगण्यात आले मात्र आग्रा स्थानकावरही स्वच्छता झाली नाही. ग्वालियर, झासी, भोपाळ, इटारसी आदी स्थानकांवरही शौचालयांची स्वच्छता न झाल्याने तुंबलेल्या शौचालयातील मलमुत्र शौचालयाबाहेर येवून दुर्गंधी पसरली. सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान सचखंड एक्सप्रेस भुसावळ स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांनी गोंधळ घालून तब्बल साडेनऊ वाजेपर्यंत दोन तास गाडी थांबवून ठेवली. सुरवातीला रेल्वे प्रशासनाने पूढील स्थानकावर स्वच्छता होईल, असे सांगून टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र यानंतर प्रवाशांनी स्वच्छतेची मागणी लावून धरल्याने किरकोळ स्वच्छता केल्यानंतर पावणेदोन ते दोन तासांनी सचखंड एक्सप्रेस जळगावकडे रवाना झाली.

रेल्वे प्रशासनाविषयी तीव्र संताप
एकीकडे रेल्वे प्रशासन अस्वच्छता असल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन करीत असताना दुसरीकडे रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छता होत नसल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 12716 अप अमृतसर-हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेसमध्ये दिल्ली स्थानकापासून शौचालयांची स्वच्छता झाली नाही. यामुळे शौचालय तुंबून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.