भुसावळात संपादीत जमिनीच्या नावाखाली शासनाची फसवणूक : बड्या व्यापार्‍यांविरोधात गुन्हा

भुसावळ : संपादीत शेतजमीन भरपाईची तब्बल 13 लाख 74 हजार 316 रुपयांची रक्कम परस्पर बँक खात्यात वळती करून शासन व तक्रारदाराची फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळातील बड्या व्यापार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सन 2013 मध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकाराविषयी 2021 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पाच संशयीतांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
भुसावळ शहर पोलिसात राजेश गंगाधर जोशी (50, मॉडर्न रोड, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी तथा व्यापारी मंगेश दीपचंद लढ्ढा (बद्री प्लॉट, भुसावळ), प्रेमराज विठ्ठलदास बढे, महेंद्र शांतीलाल सुराणा (गंगाराम प्लॉट, भुसावळ), ब्रजेश राध्येश्याम लाहोटी (गायत्री शक्तीपीठाजवळ, भुसावळ), स्मिता राजेश काकाणे (वरणगाव, ता.भुसावळ) यांच्याविरोधात भादंवि 420, 467, 468, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रांताधिकारी प्रशासनाची फसवणूक
राजेश जोशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वरील पाचही संशयीत आरोपींनी रजिस्टर खरेदी खतात ‘लिहून देणार’ या शब्दात बदल करून ‘लिहून घेणार’ असा शब्दप्रयोग केला तसेच योगेश गंगाधर जोशी यांच्या नावाची सही नसलेला 2 जुलै 2013 रोजीचा खोटा व बनावट स्टॅम्प बनवून सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांच्याकडे खोटे व बनावट दस्तावेज सादर करून 25 सप्टेंबर 2013 ते 14 ऑक्टोबर 2015 दरम्यान संपादीत जमिनीची 13 लाख 74 हजार 316 रुपयांची रक्कम बँक खात्यात वर्ग करून फिर्यादी व शासनाची फसवणूक केली. तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.