अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या आवारातील घटना : संशयीत भारत बंदमधील दगडफेकीतील आरोपी
भुसावळ- भुसावळात बुधवार, 29 रोजी भारत बंद दरम्यान हिंसक जमावाने मॉडर्न रोडवरील आर्य निवास रेस्टारंट पोलिसांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी 200 जणांच्या जमावाविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली होती तर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. शुक्रवारी आरोपींची न्यायालयीन कोठडी संपल्याने त्यांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिस न्यायालयात आले होते. यावेळी संशयीत आरोपींना भेटण्यासाठी त्यांचा मित्रही आला होता मात्र हा मित्र दगडफेकीतही सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस त्याला पकडण्यासाठी धावले मात्र त्याचवेळी संशयीत सावध झाला व पोलिसांच्या हातावर तूरी देत त्याने पळ काढला. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी मात्र गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
307 च्या गुन्ह्यात 11 आरोपींना अटक
बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरीकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी बुधवारी भारत बंदची हाक दिली असलीतरी व्यापार्यांनी बंद झुकारून प्रतिष्ठाने सुरू ठेवल्याने जमावाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील आर्य निवास रेस्टारंटवर दगडफेक केली होती तर काझी प्लॉट भागात जमाव नियंत्रीत करण्यासाठी आलेल्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांसह कर्मचार्यांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी आर्य निवासवर दगडफेक केल्यासह पोलिस कर्मचार्यांवर दगडफेक करून जखमी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत सीसीटीव्हीच्या आधारावर 11 संशयीतांना अटक करण्यात आली होती. या आरोपींची शुक्रवारी न्यायालयीन कोठडी संपल्याने त्यांना पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात (307) मध्ये अटक करण्यात आली. दरम्यान, संशयीत आरोपींना भेटण्यासाठी त्यांचा एक मित्र न्यायालयाच्या आवारात थांबून असतानाच बाजारपेठ पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष गेल्यानंतर तोदेखील दगडफेकीत वॉण्टेड असल्याने त्यास पकडण्यासाठी ते धावले मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाला.