भुसावळात सराफांचा कडकडीत बंद

भुसावळ : एचआयडी नंबरच्या जाचक अटी तसेच स्टॉक डिक्लेरेशन संबंधीची सक्ती व हॉलमार्किंग पद्धत अयोग्य रीतीने राबविण्याच्या धोरणाच्या विरोधात सोमवारी भुसावळ शहर सराफ असोसिएशनने निषेध नोंदवत कडीकडीत बंद पाळला. शहरातील सराफ बाजार बंदमुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली. नवीन नियमांच्या हॉलमार्कला सराफ व्यावसायीकांचा विरोध नाही, मात्र केंद्र सरकारचे बीआयएस डिपार्टमेंट ज्या पद्धतीने या कायद्याची अंमलबजावणी करते आहे त्यामुळे सराफ व्यावसायीकांना व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या जाचक नियमांचा सामान्य ग्राहकांना ही बसणार आहे. या धोरणांचा निषेध नोंदवत बंद पाळण्यात आला. यावेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष वसंत श्रीधर विसपुते व सर्व व्यावसायीक उपस्थित होते. दरम्यान मंगळवारी देखील साप्ताहिक सुटी असल्याने शहरातील सराफा दुकाने बंद असतील.