भुसावळात सलग तिसर्‍या वर्ष ‘रन भुसावळ रन’

0

निरामय व सुदृढ आरोग्यासाठी स्पर्धेचे आयोजन : उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांची पत्रकार परीषदेत माहिती : तीन, पाच व दहा किलोमीटर अंतरासाठी होणार स्पर्धा : जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत 5 जानेवारीला स्पर्धेचे नियोजन

भुसावळ- निरामय व सृदृढ आरोग्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे सलग तिसर्‍या वर्षी 5 जानेवारी 2019 रोजी भुसावळात ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेर्चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांनी पत्रकार परीषदेत दिली. जामनेर रोडवरील उपअधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेत राठोड म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून भुसावळकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदादेखील तिसर्‍या वर्षी तीन, पाच व दहा किलोमीटर अंतरासाठी स्पर्धा घेण्यात येत असून सुमारे दोन हजार स्पर्धक त्यात सहभागी होणार आहेत.

विजेत्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र तर सहभागासाठी नाममात्र फी
सलग तिसर्‍या वर्षी होणार्‍या स्पर्धेतील अनुक्रमनिहाय विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस, मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात येणार आहे तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी नाममात्र प्रवेश आकारली जाणार आहे. त्यात तीन किलोमीटरसाठी 300 रुपये तर पाच किलोमीटरसाठी 400 व दहा किलोमीटरसाठी 600 रुपये फी आकारण्यात येणार आहे. स्पर्धेतील स्पर्धकांना आयोजकांतर्फे टी शर्ट, गुडीबॅग, मेडल, प्रमाणपत्र तसेच अनुक्रमांकही दिला जाणार आहे. दरम्यान, स्पर्धेच्या मार्गावर कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी रुग्णवाहिका तसेच डॉक्टरांची टीम व स्वयंसेवक नेमले जाणार आहेत.

तीन गटातील स्पर्धेसाठी असा राहणार मार्ग
पोलिस उपअधीक्षक राठोड यांच्या माहितीनुसार, तीन किलोमीटर अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड पासून युटर्न घेऊन पुन्हा डॉ. आंबेडकर मैदान तर पाच किलोमीटर अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डीएस ग्राऊंड) पासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड, हॉटेल हेवन पासून युटर्न घेत पुन्हा मैदान तर 10 किलोमीटर अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड, हॉटेल हेवनपासून युटर्न घेत वसंत टॉकीज रीक्षा थांबा, दोन नंबरचा पेट्रोल पंपाजवळील डाव्या बाजूला वळत सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, कोनार्क हॉस्पीटल, वाय पॉईंटपासून युटर्न घेत पुन्हा डी.एस.ग्राऊंड असा स्पर्धेचा मार्ग राहणार आहे.

स्पर्धेसाठी आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर
अत्यंत काटेकोर नियोजनासह स्पर्धकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेत रन भुसावळ रन स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेसाठी धावपटूंनी कापलेले अंतराचे परफेक्ट टायमिंग कळण्यासाठी आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. स्पर्धेचे संपूर्ण अंतर कापल्यानंतर स्पर्धक मूळ स्थळी आल्यानंतर त्याच्या भ्रमणध्वनीवर त्याने नेमके किती मिनिट व सेकंदात अंतर कापले याची माहिती मिळणार असल्यने या स्पर्धेत पारदर्शकता हा निकष महत्त्वाचा ठरणार आहे.

15 डिसेंबरपर्यंत करता येणार नोंदणी
स्पर्धेसाठी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत स्पर्धकांना ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणी (लर्हीीरुरर्श्रीीप.लेा) या वेबसाईटवर करता येणार आहे तर ऑफलाईन नोंदणीसाठी भुसावळ शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ पोलिस ठाणे, विघ्नहर्ता पब्लिकेशन, शिवाजी कॉम्प्लेक्स, भुसावळ तसेच रण भुसावळ रन कार्यालय, म्युन्सीपल पार्क, भुसावळ या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे.

नववर्षाच्या 5 रोजी गुलाबी थंडीत धावणार भुसावळकर
नवीन वर्षाच्या 5 जानेवारी रोजी पहाटेच्या गुलाबी थंडीत तीन गटातील स्पर्धेत भुसावळकर धावणार असून या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. दोन हजार स्पर्धक या सहभाग नोंदवणार असून 12 वयोगटाच्या स्पर्धकापासून वयाच्या पंच्याहत्तरी गाठलेल्या चिरतरुण स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग नोंदवता येणार आहे.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
या पत्रकार परीषदेला बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सिद्धीविनायक गु्रपचे संचालक यतीन ढाके, भाजपा महाराष्ट्र ओबीसी संघटना सरचिटणीस अजय भोळे, विकास पाचपांडे, गोदावरीचे प्राचार्य प्रवीण फालक, मनीष नेमाडे, अनिल आर.चौधरी, शुभम महाजन, समीर पाटील, क्रीडा शिक्षक रमण भोळे आदी उपस्थित होते.