भुसावळात सलग दुसर्‍या वर्षी वाद्य व मिरवणुकीविना गणरायाचे शांततेत विसर्जन

स्थानिक पालिका व पोलीस प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अप्रिय घटना टळल्या : राहुल घाटावर बॅरीकेटींग ; जीवन रक्षकांनी केले विसर्जन

भुसावळ : दहा दिवसांच्या उत्सवानिमित्त लाडक्या गणरायाला मोठ्या भक्तीभावाने शहर व परीसरात निरोप देण्यात आला. कोरोच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसर्‍या वर्षी प्रशासनाने वाद्यासह मिरवणुकीला परवानगी नाकारल्याने नियमांचे शहरात काटेकोरपणे पालन करून श्रींना निरोप देण्यात आला. यंदा प्रथमच तापी काठावरील राहुलनगर व फिल्टर हाऊस घाटावर पोलीस व पालिका प्रशासनाने उत्कृष्ठ नियोजन केल्याने अप्रिय घटना टळल्या व रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत श्री विसर्जन शांततेत पार पडले. शहरात पालिकेने 9 संकलन केंद्र उघडल्याने त्यातून एक हजार 803 गणेशमूर्ती संकलीत करण्यात आल्या.

40 क्विंटल निर्माल्य संकलन
पालिकेने निर्माल्य संकलनासाठी व्यापक नियोजन केले. तापीपात्रात जाण्यापूर्वीच भाविकांकडून निर्माल्य संकलन केले जात होते. तब्बल सहा ते सात टॅक्टर ट्रॉलीतून सुमारे 40 क्विंटल निर्माल्याचे संकलन करण्यात आले. पालिका प्रशासनाकडून संकलीत निर्माल्याचे एका ठिकाणी संकलन करण्यात आले असून यापासून कंपोस्टींग खत तयार केले जाणार आहे. हे कंपोस्ट खत पालिका उद्यानांतील झाडांना देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मिरवणूक मार्गावर बॅरीकेटींग
शहरात गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक नसली तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून शहरातील मिरवणूक मार्गावरही बॅरीकेटींग करण्यात आले. या सोबतच प्रार्थनास्थळे ताडपत्रीने झाकण्यात आली. या ठिकाणी नेहमीप्रमाणे पोलीस व पालिका कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

रेल्वे कर्मचार्‍यास बचावले
ताप पात्रात विसर्जनासाठी भाविकांना प्रवेशबंदी असल्याने काही भाविक तापीच्या उत्तरदिशेकडील पात्रात जावून स्वहस्ते विसर्जन करीत असताना 35 वर्षीय रेल्वे कर्मचारी भाविक तापीत बुडाला. बाप्पाच्या रुपानेच जीवनरक्षक, आपत्तकालीन बोट, अष्टविनायक मंडळाचे पदाधिकारी व भाविक मदतीला धावून आल्याने भाविकाचे प्राण बचावले. भुषण प्रभाकर इंगळे (35, रा.गोदावरी कॉलनी, भुसावळ) असे बचावलेल्या रेल्वे कर्मचार्‍याचे नाव आहे. आरडाओरड झाल्याने सुरेंद्र धौसले व सुमेेंद्र धौसले हे दोन्ही भाऊ (रा. टिंबर मार्केट, भुसावळ) व महाकाल मंडळच्या सदस्यांनी सदर व्यक्तीस वाहून जाण्यापासून रोखले. ही घटना दक्षिण तिरावर असलेल्या बचाव पथकाच्या निदर्शनात येताच त्यांनी सुसाट वेगाने मोटारबोट घटनास्थळाकडे नेली. बुडणार्‍या व बचाव कार्यासाठी पोचलेल्यांनाही धीर देत बाहेर काढले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिह रावळ यांच्या नेतृत्वाखाली पथकातील वन्यजीव व अर्जुना संस्थेचे सदस्य सतीश कांबळे, स्कायलेब डीसुजा,चेतन बोरणारे, मेनूल फर्नाडिस,आशिष अलोटकर, एलेंन मेसन यांनी कर्तव्य बजावले. बोट व दोन्ही धौसले बंधू बाप्पाच्या रुपाने धावून आल्याने भुषण इंगळे यांचे प्राण बचावले. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आदींनी इंगळे यांची चौकशी केली तसेच जीवनरक्षक, वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य, महाकाल मंडळाच्या सदस्यांचे कौतूक केले.

शहरातून साडेआठ हजार मूर्तींचे विसर्जन
यंदा शहरातील महादेव घाटावर विसर्जन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले तर केवळ फिल्टर हाऊस व राहुल नगर या दोन घाटांवर विसर्जन झाले. जीवन रक्षकांच्या माध्यमातून श्री विसर्जन करण्यात आले. पालिका, पोलीस व शिक्षण विभागाच्या माध्यमातून शहरातील नऊ ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्यात आले. प्रत्येक केंद्रावरुन वाहनाव्दारे रात्री आठ वाजता तापीनदीवर संकलीत मूर्ती आणून त्यांचे विधीवत विसर्जन करण्यात आले. शहरातील सुमारे आठ हजार 500 घरगुती गणेशमूर्तींचे तापीपात्रात अत्यंत शिस्तमय व शांततेच्या वातावरणात विसर्जन करण्यात आले. काही गणेश मंडळांनी वाघूर बॅकवॉटर, साकेगाव वाघूर नदी आदी ठिकाणी बाप्पाचे विसर्जन केले.