सत्ताधार्यांच्या भावना बोथट ; सहा वर्षांपासून समस्येकडे होतेय दुर्लक्ष
भुसावळ (विजय वाघ)- रेल्वेचे जंक्शन स्थानक असलेल्या शहरातील नागरीकांना अपघातात मृत्यू झालेल्या मयतांच्या शवविच्छेदनासाठी हेलपाटे घेत मृतदेहासह जळगाव शहर गाठावे लागते. तब्बल सहा वर्षांपासून अधिक काळापासून हा प्रकार सुरू असताना शहरातील लोकप्रतिनिधी तसेच सत्ताधार्यांकडून कुठल्याही उपाययोजना होत नसल्याने त्यांच्यावर नागरीकांकडून टीकेचा भडीमार होत आहे. नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका शहरात असून दरवर्षी सुमारे 200 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर होतो तर असे असतानाही मानधनावर साधा वैद्यकीय अधिकारीदेखील पालिकेला नेमता न आल्याचे दुर्दैव आहे. काही वर्षांपूर्वी पालिका दवाखान्यात शवविच्छेदन होत असलेतरी आरोग्य विभागाने पदे गोठवल्याने शहरात शवविच्छेदन होणे बंद झाल्याने जळगावसह वरणगाव गाठावे लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या कामास गती देण्याची गरज
रेल्वेचे जंक्शन स्थानक, शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग, दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्प यामूळे या शहरात आणि तालुक्यात विविध अपघातांच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. अपघातांच्या घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अशा प्रसंगी पोलीस ठाण्यात दाखल होत असलेल्या गुन्ह्यामुळे मयताचे कायदेशिररीत्या शवविच्छेदन करणे क्रमप्राप्त आहे मात्र येथील पालिकेच्या रूग्णालयात शवविच्छेदनाची परवानगी नसल्याने मयतांच्या नातेवाईकांना मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी वरणगाव अथवा जळगाव गाठावे लागते. यासाठी त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत असल्याने सत्ताधार्यांच्या भावना बोथट झाल्याची टिका होत आहे. यामूळे प्रशासनाने नागरीकांच्या या भावनांचा आदर करून शहरातच शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेल्या ग्रामीण रूग्णालयाच्या कामास गती देण्याची मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
नागरीकांना नाहकचा त्रास
शहरातील रेल्वे स्थानक परीसरात अनोळखी व्यक्ती व प्रवासा दरम्यान प्रवाशाचा अपघाती मृत्यूच्या घटना नित्याच्याच झाल्या असून अशा घटनांची पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली जाते. यामुळे मयताचे शवविच्छेदन करणे आवश्यक असल्याने पोलिसांना व नातेवाईकांना मृतदेहासह नाहकचा त्रास सहन करीत 25 किलोमिटर वरील जळगाव गाठावे लागते. यात संबंधिताचा वेळ तर खर्ची पडतोच मात्र शासकीय वाहनावरील इंधनही वाया जावून मोठ्या प्रमाणावर खर्चदेखील शासनाला करावा लागतो.
आरोग्य तपासणी यावलला
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीताची शासकीय रूग्णालयातच आरोग्य तपासणी करणे क्रमबाह्य आहे. यासाठी पोलिसांना संशयीत आरोपीला घेवून यावल तालुका गाठावा लागतो. यामुळे पोलिसांचा वेळ वाया जातो शिवाय दरवेळी मोठ्या प्रमाणावर इंधनही खर्च होते. या द्राविडी प्राणायमामुळे अनेकदा छोट्या-मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची इच्छा असूनही बर्याचदा पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचा अनुभव आहे.
वरणगावातही होत नाही वेळेवर शवविच्छेदन
भुसावळ शहरापासुन अवघ्या 12 किलोमिटर अंतरावर असलेल्या वरणगाव शहरात ग्रामीण रूग्णालय आहे.या रूग्णालयात वैद्यकिय अधिकार्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी यासाठी वरणगावकरांनी वारंवार आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधल्याने येथे वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र येथेही वेळेवर शवविच्छेदन होईल किंवा नाही याची शाश्वती नसल्याने अनेकांना जळगावचा मार्ग स्विकारावा लागत असल्याने नागरीकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.
रूग्णालयातही असुविधा
नगरपालीकेच्या संत गाडगे महाराज रूग्णालयात महत्वाच्या व अत्यावश्यक सुविधांची आवश्यकता आहे.मात्र पालीकेच्या आरोग्य विभागाचे सोयी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने पालीकेच्या या रूग्णालयाकडे अनेक रूग्ण पाठ फिरवातांना दिसतात.