कारमधून वाहतूक होताना कारवाई ; बाजारपेठ पोलिसांची धडक कारवाई
भुसावळ- मध्यप्रदेशातून जळगावमध्ये विक्रीसाठी जात असलेला तब्बल सहा लाख 35 हजार 500 रुपयांचा विमल गुटखा बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी सायंकाळी जप्त करीत दोघांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कारचालक दीपक रमेश चेतवानी (वय 18) व सीमरन रमेश चेतवानी (वय 38, दोघे रा. सिंधी कॉलनी, प्रेम गल्ली जळगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तीन लाखांचे कार व तीन लाख 35 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
पाठलाग करून आरोपींच्या आवळल्या मुसक्या
शनिवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास महामार्गावरील खडका चौफुलीवर पोलिस कर्मचारी नंदकुमार परदेशी व दीपक पाटील वाहनांची तपासणी करीत असताना वरणगावकडून वॅगन आर कार (क्र.एम.एच.19 सी.यू.8418) भरधाव वेगाने नाहाटा चौफुलीकडे निघाली असता पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतरही कार न थाांबल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी दुचाकीने वाहनाचा पाठलाग करून कारला नाहाटा चौफुलीजवळ अडवले. कारची तपासणी केली असता दोन लाख 31 हजार रुपये किमतीचा विमल गुटखा, एक लाख चार हजार 500 रुपये किमतीचे पांढर्या रंगाचे गुटख्याचे गाठोडे आढळले. यासह बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक व तस्करी करणे, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघण केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नंदकुमार परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अंबादास पाथरवट, हवालदार युवराज नागरुत, नाईक सुनील थोरात, दीपक जाधव, संजय भदाणे, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, सचिन चौधरी, योगेश माळी, राहुल चौधरी, विनोद वितकर बंटी कापडणे आदींनी केली. अन्न व औषध प्रशासनाला पुढील कारवाईबाबत कळवण्यात आले आहे.