भुसावळ (चेतन चौधरी)। भुसावळ शहर हे ज्याप्रमाणे रेल्वेचे जंक्शन म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे अवैध धंदे तसेच गुन्हेगारांचे आश्रयस्थान देखील बनू पाहत आहे. गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता भुसावळ हे बिहारच्या वाटेवर त जात नाही ना? असा प्रश्न पडत होता. मात्र सहायक पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी येथील पदभार घेताच हे चित्र बदलले असून त्यांच्या जोडीला तालुका पोलीस स्थानकाची जबाबदारी सांभाळणारे मनीष कलवानिया आल्यावर तालुक्यातील ‘नंबर दोन’वाले धास्तावल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहरात कायम आयपीएस अधिकारी हवा असल्याची गरजदेखील अधोरेखित झाली आहे.
झुगारला राजकीय दबाव ः डिवायएसपी निलोत्पल यांनी देखील कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता भुसावळ उपविभागात सुरु असलेल्या गुन्हेगारांवर कारवाईचा प्रहार करुन त्यांना सळो कि पळो करुन सोडले आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे ‘सिंघम’ पोलीस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जात आहे. त्यांच्या सोबतीला तालुका पोलीस स्थानकाचा कार्यभार सांभाळणारे सहाय्यक पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी देखील भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये देखील समाधान व्यक्त होत आहे.
अवैध धंदे बंद : आपल्या कार्यकर्त्यांची सोय होण्याच्या दृष्टीने राजकारण्यांच्या पाठबळामुळे सट्टा, पत्ता, दारुविक्री सारखे अवैध धंदे फोफावत असतात. मात्र राजाश्रयामुळे यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. मात्र निलोत्पल यांनी कठोर कारवाई सुरू केली. शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी ते स्वत: शहरात पायी फिरतात हे विशेष. यासोबत त्यांनी शहरात राजकीय आर्शिवादामुळे राजरोसपणे सुरु असलेले अवैध धंदे, सट्टा, पत्ता, दारु विक्री यांच्यावर धडक कारवाई करुन अवैध धंदेवाईकांना पळता भुई थोडी केली.
साहेबांमुळे ‘सिस्टीम’ही हालली
भुसावळात याआधी रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार्या हातगाड्या आणि हॉटेल व ढाब्यांवरील वर्दळ ही अनेक गैरप्रकारांना खतपाणी घालणारी असल्याची बाब उघड होती. मात्र राजकीय वरदहस्त व आर्थिक देवाण-घेवाणीमुळे हे प्रकार सर्रासपणे सुरू होते. तथापि निलोत्पल स्वत: रस्त्यावर उतरल्यामुळे आजचे चित्र आहे. साहेबांमुळे सिस्टीम हालल्याचे चित्र आहे. तालुका पोलीस स्थानकात मनीष कलवानिया आल्यामुळेही याच प्रकारचे चित्र आहे. आता दोन आयपीएस अधिकारी आल्यामुळे झालेला बदल तालुक्यातील जनता अनुभवत आहे. यामुळे भुसावळ उपविभागाची धुरा नेहमी आयपीएस अधिकार्याकडे द्यावी या मागणीला पुन्हा नव्याने बळ मिळाले आहे.
साध्या वेशात फिरण्याची युक्ती
डिवायएसपी निलोत्पल हे कुठेही कारवाई करण्यासाठी साध्या वेषात दुचाकीवर जाऊन अगोदर एकट्यानेच येथील झाडाझडती घेतात. यानंतर ते आपल्या कर्मचार्यांना याची सुचना देऊन याठिकाणी कारवाई केली जाते. त्यांच्या बरोबरीला प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी देखील ग्रामीण भागात कारवाईचा धडका लावला असून हे दोघे कर्तव्यदक्ष अधिकारी अजून काही वर्षे भुसावळात राहिल्यास येथील गुन्हेगारी समुळ नष्ट होईल यात तिळमात्र शंका नाही. गुन्हेगारी टोळ्यांचे आश्रयस्थान अशी या शहराची ओळख पुसावी लागणार आहे.