प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष ; पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता
भुसावळ- शहरातील व्यापारी लोकांची वसाहत असलेल्या सिंधी कॉलनीच्या प्रवेशद्वारालगतच सांडपाण्याची गटार तुंबल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेने कळस गाठला असून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे परीसरातील नागरीकांना अतोनात त्रास सहन करावा लागत असून पालिका प्रशासनाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरीकांचे आरोग्य आले धोक्यात
शहरातील जामनेर रोडवरील व्यापारी लोकांच्या सिंधी कॉलनीत वसाहतीच्या झुलेलाल प्रवेशद्वारालगत असलेली सांडपाण्याची गटार काही महिन्यांपासून पाण्याने तुंबली आहे. परीणामी गटारीतील पाणी रस्त्यावर पसरत असल्याने मार्गक्रमण करणार्या नागरीकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिवाय सांडपाण्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असल्यानेही नागरीकांना दुर्गंधीयुक्त वातावरणातच रहिवास करावा लागत आहे. इतकेच नव्हेतर सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे या भागातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत येथील स्थानिक नागरीकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली मात्र तक्रारींचा काही एक उपयोग होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
असच्छतेचा कळस
पालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे मात्र पालिका प्रशासनाकडून स्वच्छतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने शहराच्या विविध भागात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. या प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमध्ये नाराजी व आश्चर्य व्यक्त होत आहे.
रस्त्यावरही घाण
पालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातून संकलीत केलेली गटारीतील घाण व केरकचरा टॅ्रक्टरच्या साह्याने शहराबाहेर वाहून नेला जातो मात्र केरकचरा व घाण सुरक्षीत वाहतूक होत नसल्याने टॅ्रक्टरमधील घाण वाहतुकीच्या मार्गावरील गतिरोधकाजवळ पडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकाराकडेही पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे.