जबलपूरच्या प्रवाशाची बॅग अप वाराणसी एक्स्प्रेसमधून गहाळ झाल्यानंतर उघड झाली घटना ; लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेने मिळाली रोकड ; लग्नाच्या वर्हाडाची बॅग समजून भुसावळात उतरवली बॅग ; भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी आयकर विभागाला दिले पत्र
भुसावळ- अप वाराणसी एक्स्प्रेसने जबलपूरहून मुंबईत खरेदीसाठी निघालेल्या प्रवाशाची बॅग गहाळ झाल्याचा प्रकार मनमाड स्थानक आल्यानंतर लक्षात आल्यानंतर भंबेरी उडालेल्या प्रवाशाने भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाणे गाठत बॅगेत 40 लाखांची रोकड असल्याचे सांगत पोलिस प्रशासनही हादरले. लोहमार्ग पोलिसांनी बॅगेच्या वर्णनानुसार घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर लग्नाच्या वर्हाडाने ही बॅग उतरवल्याचे लक्षात आल्यानंतर शहरातील ‘त्या’ कुटुंबापर्यंत पोहोचल्यानंतर पंचांसमक्ष बॅग उघडण्यात आल्यानंतर त्यात 39 लाख 98 हजारांची रोकड सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला तर लोहमार्ग पोलिसांनीही सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, इतकी मोठी रक्कम हवालामार्गे नेली जात असल्याचा संशय असल्याने लोहमार्ग पोलिसांनी नाशिक आयकर विभागाला पत्र दिले असून संबधीत प्रवाशालाही समन्स बजावून या रकमेचा स्त्रोत विचारण्यात आला आहे.
मुंबईत खरेदीसाठी जाताना हरवली बॅग
लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, जबलपूरचा प्रवासी राहुल जगदीश गोस्वामी (21, रा.427, मळाताल, करमचंद चौक) हा 16 मे रोजी अप 12168 वाराणसी एक्स्प्रेसने जबलपूर ते मुंबई असा सर्वसाधारण तिकीटाने स्लीपर कोच क्रमांक एस- 4 च्या बर्थ क्रमांक 33 वरून प्रवास करीत होता. गोस्वामी यांचे मामा कालू गोस्वामी यांच्यासह पाच जणांचे जबलपूरमध्ये इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असल्याने त्यातील साहित्य तसेच शेती अवजारे खरेदी करण्यासाठी प्रत्येकाकडील रक्कम गोळा करून 40 लाखांची रक्कम काळ्या रंगाच्या बॅगेतून नेण्यात येत होती. 17 रोजी पहाटे या प्रवाशाला झोप लागली. सकाळी मनमाड स्टेशन आल्यानंतर प्रवाशाला जाग आल्यानंतर त्याने आपली बॅग पाहिली असता ती गहाळ झाल्याचे लक्षात येताच प्रवासी भांबावला. त्याने सहप्रवाशांना बॅगेबाबत विचारणा केली असता भुसावळात पहाटे लग्नाचे वर्हाड उतरल्याने बहुतेक या प्रवाशांनी बॅग उचचली असावी, असे सांगण्यात आल्याने या प्रवाशाने तातडीने भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून निरीक्षक दिलीप गढरी यांना झाल्या प्रकाराची माहिती दिली.
सीसीटीव्हीवरून लागला बॅगेचा शोध
लोहमार्ग पोलिस निरीक्षकांनी प्रवाशाने सांगितलेल्या वर्णनाच्या बॅगेचा शोध घेण्यासाठी 17 रोजी पहाटेचे रेल्वे स्थानकावरील अप वाराणसी एक्स्प्रेस आल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही महिला-पुरूष वर्हाडी गाडीतून उतरताना आढळले तर एका लहान मुलीजवळ संबंधित वर्णनाची बॅगही आढळली तसेच हे वर्हाडी वाहन क्रमांक (एम.एच.46 ए.एक्स.719) ने भुसावळातील गडकरी नगरात गेल्याचे कळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी गडकरी नगर गाठले. हे वर्हाडी निर्मल सत्यनारायण पिल्ले यांच्या घरातील असल्याचे कळाल्यानंतर पिल्ले कुटुंबियांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी जबलपूर येथे लग्नाला गेले असल्याचे मान्य करीत सामान जास्त असल्याने सर्व वर्हाडींनी तो उतरवल्याचे सांगत पोटमाळ्यावर ठेवलेल्या बॅगाही दाखवल्या. त्यात गोस्वामी यांनी सांगितलेल्या वर्णनाची बॅगही आढळल्याने पंचांसमक्ष या बॅगेची झडती घेतली असता त्यात 39 लाख 98 हजारांची रोकड आढळल्याने प्रवाशाने सुटकेचा मोठा श्वास घेतला. या लोहमार्ग पोलिसांच्या डायरीत नोंदही घेण्यात आली.
नाशिक आयकर विभागाला दिले पत्र
प्रवासी गोस्वामी यांनी खरेदीसाठी मुंबई जात असल्याचे सांगितले असलेतरी ऑनलाईन व्यवहाराची सुविधा असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम बाळगण्यात आल्याने सुरुवातीला जळगाव आयकर विभागाशी संपर्क साधण्यात आला मात्र संबंधित अधिकार्यांनी नाशिक आयकर विभागाशी संपर्क साधण्याचे सूचवल्यानंतर नाशिक आयकर विभागाला पत्र देण्यात आले. आयकर विभागाने या पत्राची दखल घेत प्रवासी गोस्वामी यांना समन्स बजावले असून इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम बाळगण्याचे कारण तसेच रकमेचा स्त्रोत याबाबत विचारणा केली आहे. दरम्यान, जप्त रक्कम लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात असून आयकर विभागाच्या सूचनेनंतर ती भुसावळातील ट्रेझरीत जमा करण्यात येईल. असे निरीक्षक दिलीप गढरी यांनी सांगिले.
यांच्या परीश्रमामुळे लागला बॅगेचा छडा
लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुनील इंगळे, मधुकर न्हावकर, भरत शिरसाठ, अजीत तडवी, शैलेश पाटील, जगदीश ठाकूर, सुनील पाटील, राजू पवार, अनंत रेणुके आदींनी परीश्रम घेत हरवलेल्या बॅगेचा छडा लावला. लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.