भुसावळ : अवघ्या 12 तासात मोबाईल चोरी प्रकरणी आरोपींना भुसावळातील लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले. रेल्वे प्रवासात 26 फेब्रुवारी रोजी दोन प्रवाशांचे महागडे मोबाईल लांबवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दोघा आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एक लाख 34 हजार 399 रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले. राजू लक्ष्मण कोळी (42, रा.आहुजा नगर, जळगाव) व संजय साहेबराव गोराडकर (वय 36 रा. गांधी नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
लोहमार्ग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
फिर्यादी शुभम भुपेंद्र सिंह (पटेल रोड, सुरत) व पुष्पराज संतोष कुशवाह (सतना) हे शनिवार, 26 फेब्रुवारी रोजी वेगवेगळया ट्रेनमध्ये प्रवासात असतांना त्याचे एक अॅपल कंपनीचा एक लाख 13 हजार 900 रुपये किंमतीचा 16 हजार 999 रुपये किंमतीचा मिळून एक लाख 30 हजार 899 रुपये किंमतीचा तसेच दुसर्या प्रवाशाचा तीन हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला होता. लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक काजवे, भुसावळ लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफ निरीक्षक राधाकृष्ण मीना यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलिस हवालदार धनराज लुले, जगदीश ठाकुर, अजीत तडवी व रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय प्रल्हासिंग, वसंत महाजन, आरक्षक इमरान खान, भुषण पाटील आदींनी सीसीटीव्ही फुटेजसह गोपनीय माहितीच्या आधारे दोघा आरोपींच्या मुसक्या बांधल्या. तपास हवालदार राहुल गवई व हवालदार आनंदा सरोदे हे करीत आहे.