पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड ; स्पर्धेसाठी नाव नोंदणीचे आवाहन
भुसावळ- जिल्हा पोलिस दल व सिद्धीविनायक ग्रुप, आमदार संजय सावकारे, बियाणी स्कूल व गोदावरी फाऊंडेशनच्या विद्यमाने सलग दुसर्या वर्षी रन भुसावळ रन स्पर्धेचे शहरात आयोजन 13 जानेवारी रोजी करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी सोमवारी सायंकाळी डीवायएसपी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परीषदेत दिली. या स्पर्धेसाठी आतापर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन 800 स्पर्धकांनी नोंदणी केली असून जास्तीत जास्त नागरीकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी प्रसंगी केले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते स्पर्धकांना दिल्या जाणार्या टी शर्टचे अनावरण करण्यात आले.
स्पर्धकांना मिळणार गुडीबॅग व प्रमाणपत्र
डीवायएसपी राठोड म्हणाले की, तीन, पाच व दहा किलोमीटर प्रकारात स्पर्धा होणार असून तीन किलोमीटरसाठी डी.एस.ग्राऊंड ते अष्टभूजा मंदिर व पुन्हा स्पर्धास्थळी मार्ग असणार आहे तर पाच किलोमीटर डी.एस.ग्राऊंड ते जामनेर रोडवरील हॉटेल हेवन ते पुन्हा स्पर्धा स्थळ तसेच दहा किलोमीटरसाठी डी.एस.ग्राऊंड ते हॉटेल हेवन व तेथून यु टर्न घेत वसंत टॉकीज, कोनार्क हॉस्पीटल व पुन्हा स्पर्धा स्थळ असा मार्ग राहणार आहे. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना आरएफायडी चीफ देण्यात येणार असून ती मोबाईलशी कनेक्ट असल्याने किती वेळेत स्पर्धकाने अंतर पूर्ण केले हे कळणार आहे व स्पर्धकाला तसा संदेशही प्राप्त होईल. सहभागी स्पर्धकांना एक गुडीबॅग दिली जाणार असून त्यात टी शर्ट, मेडल, प्रमाणपत्र, नास्ता व रीस्क बॅण्ड दिले जाणार आहे. दरम्यान, स्पर्धेदरम्यान स्पर्धकास काही ईजा झाल्यास वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिका सज्ज ठेवली जाणार आहे.
ग्रीन व क्लीन सिटीसह आरोग्यासाठी स्पर्धा
डीवायएसपी राठोड म्हणाले की, शहर ग्रीन व क्लीन राहण्यासह नागरीकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नवीन कल्चर तयार करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. स्पर्धेसाठी ऑनलाईन 225 तर ऑफलाईन 575 स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. 30 डिसेंबरपर्यंतच स्पर्धकांना नोंदणी करता येणार असून एकूण एक हजार 500 स्पर्धकांना या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले. स्पर्धेच्या दिवशी पहाटे वातावरण निर्मितीसाठी पहाटे पाच वाजता ‘झुम्बा डान्स’ तसेच लेझीम, ढोल पथकाद्वारे स्पर्धकांमध्ये उत्साह भरला जाईल. स्पर्धेतील गटनिहाय विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसेही दिली जाणार आहेत.
स्पर्धेसाठी पोलिस अधीक्षक, कलेक्टर येणार
रन भुसावळ रन या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, आमदार संजय सावकारे, डीआरएम आर.के.यादव, ऑर्डनन्स फॅक्टरीचे महाव्यवस्थापक राजीव पुरी, सिद्धीविनायक गु्रपचे चेअरमन कुंदन ढाके, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, दीपनगरचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्यासह लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धकांसाठी स्पर्धा मार्गावर सेल्फि पॉईंट
स्पर्धेच्या मार्गावर तसेच डी.एस.ग्राऊंडवर स्पर्धकांसाठी तसेच नागरीकांसाठी सेल्फि पॉईंटची उभारणी करण्यात येणार आहे. स्पर्धेबाबत जनजागृती करण्यासाठी इन्स्टाग्राम व फेसबुकद्वारे जनजागृती केली जाणार असल्याचे डीवायएसपी राठोड म्हणाले. दर गुरुवारी व रविवारी स्पर्धकांसाठी सराव घेतला जाणार असून त्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
यांची पत्रकार परीषदेत उपस्थिती
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले, सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक तथा भुसावळ रनचे समिती सदस्य यतीन ढाके, शुभम महाजन, प्रा.प्रविण फालक, वरूण इंगळे, विघ्नहर्ता पब्लिकेशनचे रवी निमाणी, क्रीडा शिक्षक रमण भोळे, पूनम भंगाळे, प्रा.प्रविण पाटील, डॉ.संजय नेहते, प्रवीण वारके आदींची उपस्थिती होती.