जिल्हाधिकार्यांचा दुसर्या दिवशीही सलग धडाका ; पुन्हा एका दुकानाचा परवाना केला रद्द
भुसावळ– स्वस्त धान्यातील सावळा गोंधळाची जिल्हाधिकार्यांची गांभीर्याने दखल घेत बुधवारी भुसावळात 13 दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द तर चार दुकानांचे परवाने निलंबित केले होते. या कारवाईनंतर दुसर्याच दिवशी गुरुवारीदेखील भुसावळातील एका दुकानाचा परवाना कायमस्वरुपी निलंबित करण्यात आला असून अन्य 16 दुकानदारांचे डिपॉजिट जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने स्वस्त धान्य दुकानदारांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकार्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयाचे जनतेतून स्वागत होत आहे. भुसावळातील स्वस्त धान्यातील झालेल्या ‘मापातील पाप’ प्रकरणी आता काय कुणा-कुणावर कारवाई होते? याकडे लक्ष लागले आहे.
आधी तपासणी नंतर परवाने रद्द
30 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकार्यांच्या विशेष पथकाने शहरातील स्वस्त धान्य दुकानांची अचानक तपासणी केली होती. यावेळी अनेक दुकानांमधील अनागोंदी समोर आली होती तर अनेक दुकाने बंद आढळली होती. त्याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर 13 दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले तर अन्य चार दुकानांचे तात्पुरते निलंबन करण्यात आले.
पुन्हा धडाका, डिपॉझिट जप्त
जिल्हाधिकार्यांनी स्वस्त धान्यातील सावळा-गोंधळाची गांभीर्याने दखल घेत मिश्रा नामक दुकानदाराचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला असून उर्वरीत 16 दुकानदाराचे डिपॉझिट जप्त केले आहे. या कारवाईला जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी दुजोरा दिला.