भुसावळात 30 गुन्हेगारांच्या घरांची पोलिसांकडून झाडाझडती

0

भुसावळ- दिवाळी सणातील अप्रिय घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून रविवारी मध्यरात्री शहरातील 30 गुन्हेगारांच्या घराची झाडाझडती घेवून गुन्हेगारांच्या हालचाली तपासण्यात आल्या. या मोहिमेत पोलिसांच्या हाती काहीही लागले नसलेतरी गुन्हेगारांच्या उरात यामुळे मात्र चांगलीच धडकी भरली आहे.

अप्रिय घटना रोखण्यासाठी पोलिसांची मोहिम
दिवाळीनिमित्त अनेक कुटूंब बाहेरगावी जात असल्याने चोर्‍या-घरफोड्यांचे प्रमाण अधिक असल्याने अप्रिय घटना रोखण्यासाठी पोलिसांनी शहर व बाजारपेठ हद्दीतील 30 गुन्हेगारांच्या झराची झडती घेतली. यासाठी ऑल आऊट जाहीर करण्यात आल्याने सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व त्यांचे पोलिस कर्मचारी तसेच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार व त्यांचे पोलिस कर्मचारी, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व त्यांचे पोलिस कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात ही मोहिम राबवली, पोलिसांच्या यादीवरील सर्वच गुन्हेगार घरी आहेत वा नाही याची तपासणी करण्यात आली. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 10 गुन्हेगारांना रात्री तपासण्यात आले असता ते घरीच आढळले तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतीलही गुन्हेगार तपासणीच्या काळात घरी होते. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दितील ग्रामीण भागातील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली.