शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण होणार स्पष्ट
भुसावळ- शहरातील डिस्को टॉवरच्या मागील बोळात सुमारे 35 वर्षीय अनोळखी युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात असलेला मृतदेह बुधवारी दुपारी तीन वाजेच्या आढळल्यानंतर शहरात खळबळ उडाली. या युवकाचा खून झाल्याची अफवाही पसरली मात्र युवकाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालाअंती कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी घेतली धाव
घटनेची माहिती कळताच डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी भेट दिली. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप इंगळे यांना घटनास्थळावर बोलावल्यानंतर त्यांनी मृत व्यक्तीची तपासणी केली. मृत व्यक्तीच्या अंगावर कुठेही जखमा नसल्याचे तपासणीत समोर आले. मात्र प्रत्यक्ष शवविच्छेदन झाल्यावरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्यचे सूत्रांनी सांगितले. बाजारपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी सुमीत आसरानी यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मृत व्यक्ती गर्दुल्ला असून त्याची ओळख पटवण्यासह त्याचा नेमका मृत्यू कसा झाला? याचा उलगडा बाजारपेठ पोलिसांकडून केला जात आहे.