भुसावळात 35 विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई

0

भुसावळ : शहरातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रांताधिकार्‍यांनी दुकानदारांना दुकाने उघडण्याचे दिवस ठरवून दिले आहेत मात्र त्यानंतर काही दुकानदार नियमांचे उल्लंघण करीत असल्याचे सातत्याने आढळून येत असल्याने पालिकेच्या पथकाकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे शिवाय भाजी बाजार भरवण्याचे दिवस असतानाही शुक्रवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर विक्रेत्यांनी बाजार भरवल्याने पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करीत दंड वसुल केला. शहरातील विविध भागात झालेल्या कारवाईत 35 दुकानदारांकडून तब्बल तीन हजार 700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

पालिका पथकाने सामान केले जप्त
शुक्रवारी पालिकेच्या पथकाने अप्सरा चौक, मुख्य बाजार, मोटू शोभराज चौक, विकास कॉलनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करीत दंड वसुल केला. या कारवाईने विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. शुक्रवारी भाजीपाला व फळविक्री तसेच हातगाड्यांवरुन कापड, कटलरी विक्री करता येणार नसतानाही विके्रते बाजारपेठेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या पथकाने संबंधिताचे सामान जप्त करीत पालिकेत आणले. दंडाची रक्कम भरणार्‍या विक्रेत्यांना सामान परत देवून तंबी देण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरूच होती.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई अभियंता पंकज पन्हाळे, लेखापाल संजय बाणाईते, राजू वाघ, चेतन पाटील, रामदास म्हस्के, सुरज नारखेडे, महेश चौधरी, परवेज शेख, अनिल भाकरे, विजय राजपूत, अनिल मनवाडे, राजेंद्र नाटकर, किरण मनवाडे आदींच्या पथकाने केली.

दुकानाबाहेरील सामान केला जप्त
मुख्य बाजारपेठेतील कपडा मार्केट जवळील व्यापारी संकुलात किराणा दुकानदार थेट दुकानाबाहेर वापरण्याच्या रस्त्यात माल ठेवत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याने अशा विक्रेत्यांचाही मालही पालिका पथकाकडून जप्त केला जात आहे. विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.