भुसावळात 60 वर्षीय वृद्धेचा संशयास्पद मृत्यू

0

घातपात झाल्याची शंका ; शवविच्छेदनानंतर कळणार कारण

भुसावळ- शहरातील अकबर टॉकीज परीसरातील 60 वर्षीय बेपत्ता वृद्धेचा हात नसलेल्या अवस्थेतील मृतदेह रेल्वेच्या झेडआरटीआय परीसरात रविवारी सकाळी आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या वृद्धेचा खून करण्यात आला की अन्य कारणाने तिचा मृत्यू झाला? याबाबत ठोस कारण कळू शकले नाही. वैद्यकीय पथकाने जागेवरच या महिलेचे शवविच्छेदन केले. सरला अशोक भांडारकर (60, रा.अकबर टॉकीज परीसर, भुसावळ) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

बेपत्ता वृद्धेचा अखेर आढळला मृतदेह
पतीच्या मृत्यूनंतर आपल्या 37 वर्षीय मतिमंद मुलगी सारीकासह सरला भांडारकर या अकबर टॉकीज भागात भाडे तत्वावरील घरात वास्तव्यास होत्या व पतीच्या पेन्शनवरच त्यांची गुजराण सुरू होती. गुरुवारी त्यांच्यासह मुलगी सारीका घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या परीचितांनी त्यांच्या रेल्वेत खलाशा असलेल्या स्नुषा कल्याणी जितेंद्र भांडारकर (15 बंगला, भुसावळ) यांना कल्पना दिली. सासु व त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याने कल्याणी यांनी त्यांच्या अकबर टॉकीज भागातील घराला भेट दिल्यानंतर घराबाहेर सारीका हे जखमी अवस्थेत असल्याने त्यांनी तिच्यावर औषधोपचार करून शनिवारी शहर पोलिस ठाणे गाठत कैफियत मांडली. पोलिसांनी या प्रकरणी सरला भांडारकर बेपत्ता झाल्याबाबत मिसिंगची तक्रार दाखल केली.

गँगमनच्या सतर्कतेने घटना उघडकीस
रेल्वेत खलाशी पदावर असलेल्या कल्याणी भांडारकर यांच्या सासु बेपत्ता असल्याने त्यांनी त्यांचा शोध सुरू केला असतानाच रविवारी एका गँगमनने कल्याणी यांना झेडआरटीआय भागातील दुसर्‍या रेल्वे गेटजवळ एका वृद्धेचा मृतदेह असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी लागलीच धाव घेतली. मृतदेहाजवळील चप्पल व साडी पाहिल्यानंतर त्यांनी हा मृतदेह आपल्याच सासुचा असल्याचे लक्षात येताच शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, अनिल चौधरी, मो.वली सैय्यद, विनोद तडवी, समाधान पाटील, संजय बडगुजर, जुबेर शेख, मोहन पाटील, साहिल तडवी, शंकर पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

खुन की नैसर्गिक मृत्यू ? कारण गुलदस्त्यात
सरला अशोक भांडारकर (60) ही बेपत्ता वृद्धा इतक्या लांब आलीच कशी? हा प्रश्‍न असून त्यांचा मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मृतदेहाचे दोन्ही हात गायब असून ते तोडण्यात आले की श्‍वापदांनी ते लांबवले? असादेखील प्रश्‍न आहे तर उजव्या पायाचा गुडघादेखील तुटल्या अवस्थेत असल्याने मारहाण करून तर खून करण्यात आला नाही ना? असा प्रश्‍न आहे. दरम्यान, वृद्धेच्या अंगावर मात्र दागिने शाबूत असून दोन सोन्याच्या बांगड्या, कानातील टॉप्स तसेच पायात पैंजण असल्याने लुटीसाठी हा प्रकार घडला नसावा, असे सूत्रांनी सांगितले. रेल्वे रूळानजीक तब्बल चार दिवसांपासून मृतदेह पडून फुगल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती.

मृतदेहाचे जागीच शवविच्छेदन
चार दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती तर दोन्ही हात नसलेल्या मृतदेहाचे घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.इंगळे व त्यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने घटनास्थळी मृतदेहाचे शवविच्छेदन केले तर जळगाव येथून ठसे तज्ज्ञांसह श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले.