तांत्रिक अडचणी आल्यास झोनल अधिकार्यांशी संपर्क साधण्याची सूचना
भुसावळ- रावेर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचार्यांना ईव्हीएम सिलिंगबाबत प्रशिक्षण दिले जात असून शुक्रवारी शहरातील पांडुरंग टॉकीजसह म्युन्सीपल हायस्कूलमध्ये तब्बल 700 कर्मचार्यांना ईव्हीएम सिलिंगबाबत प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान, शनिवारीदेखील कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी सांगितले.
भुसावळात ईव्हीएम सिलिंग प्रशिक्षण
रावेर लोकसभेसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सेक्टर अधिकारी व कर्मचार्यांना मतदानापुर्वी व मतदानानंतर कंट्रोल आणि बॅलेट युनिट तसेच व्हीव्हीपॅट सिलिंग करण्याबाबत गेल्या दोन दिवसांपासून प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणासाठी प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार महेंद्र पवार, नायब तहसीलदार, विजय भालेराव आदी उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी नियुक्त अधिकारी व कर्मचार्यांनी मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची काळजीपूर्वक हाताळणी करावी तसेच मतदारांना योग्य सूचना द्याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या. मतदान यंत्रांमधील बॅटरी व अन्य किरकोळ बाबींचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. 15 व 16 एप्रिल दरम्यान निवडणूक रींगणातील उमेदवारांची नावे यंत्रांमध्ये नोंदवावे लागणार असून त्याबाबत निवडणूक विभागाकडून माहिती देण्यात आली. मतदानावेळी कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्वरी झोनल अधिकार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच तांत्रिक अडचणींबाबत सेक्टर अधिकार्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन याप्रसंगी करण्यात आले.