भुसावळ : भोरगाव लेवा पंचायतीतर्फे शहरात 9 डिसेंबर रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यात 15 वर-वधू विवाह बंधनात अडकतील. या पार्श्वभूमीवर रविवारी पंचायतीची बैठक झाली. त्यात पूर्वतयारीचा आढावा घेत कोरोना नियमांचे पालन करण्यावर एकमत झाले.
2013 पासून उपक्रमास सुरूवात
समाजातील वाढत्या अनिष्ठ प्रथांना फाटा देत भोरगाव लेवा पंचायतीतर्फे गेल्या दोन वर्षापासून सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. समाजातील प्रतिकुल परीस्थिती असलेल्यांसाठी सुरू केलेला हा सामूहिक विवाह सोहळ्यात आर्थिक सुबत्ता असलेले देखील नोंदणी करताना दिसत आहेत. त्यातून लग्नकार्यात खर्च होणारा अफाट पैसा, नाचगाणे, जेवणावळीत होणारी नासाडी आपसूक टाळली जाते. डॉ.बाळू पाटील यांच्या पुढाकारातून 2013 मध्ये या उपक्रमास सुरूवात झाली. आता 9 डिसेंबरला भुसावळ शहरातील संतोषी माता हॉलमध्ये तिसरा सोहळा होईल. त्यासाठी 15 जोडप्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी एक जोडपे इतर समाजातील आहे. या सर्व जोडप्यांना पंचायतीतर्फे कपडे, आंदण, गॅस शेगडी, दोन सिलिंडर, मिक्सर अशा भेटवस्तू दिल्या जातील.
एका विवाहासाठी 30 वर्हाडी
सामूहिक विवाह सोहळ्यात वधूकडील 15 व वराकडील 15 अशा एकूण 30 वर्हाडींना सहभागाची परवानगी आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत विवाह सोहळा पार पडणार आहे. यावेळी जेवण, वाजंत्री, ब्युटिशीयन, भटजी याचा सर्व खर्च भोरगाव लेवा पंचायतीकडून केला जाणार आहे.