भुसावळ : भुसावळातील ट्रामा केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालय हॉस्पिटलच्या आवारात शंभर खाटांसाठी ऑक्सीजन प्रकल्पाची निर्मिती होत असून त्यासाठी गुरुवारी मशनरी दाखल झाली. आमदार संजय सावकारे यांनी रुग्णालयाला भेट देत पाहणी केली.
एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजन निर्मिती
माजी पालकमंत्री आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून ऑक्सीजन प्रकल्पाची निर्मिती होत असून त्यासाठी तब्बल 32 लाख रुपये खर्च येत आहेत. एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजनची या प्रकल्पातून निर्मिती होईल. हवेमधून ऑक्सिजन घेऊन हा थेट मशिनरीच्या माध्यमातून रुग्णांना मिळेल. या प्रकल्पामुळे आता बाहेरून ऑक्सीजन सिलिंडर घेण्याचा खर्चदेखील वाचणार आहे त्यामुळे शासनाच्या पैशांची बचतदेखील होणार आहे. गुरुवारी अहमदाबाद येथून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पासाठी लागणारी मशनरी हॉस्पिटलच्या आवारात दाखल झाली. यावेळी आमदार संजय सावकारे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी, ठेकेदार अजित सिंग बेहरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मशनरी फिटिंग करण्यासाठी अहमदाबाद येथून शुक्रवारी वा शनिवारी इंजिनियर्स येतील व रविवारी प्रत्यक्षात ऑक्सीजन निर्मितीची चाचणी होण्याची शक्यता आहे. सोमवारी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या उपस्थितीत हा प्रकल्प सुरू होईल, अशी शक्यता आहे.