भुसावळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक जप्त ; प्रशासनाने सुनावला पाच लाखांचा दंड

0

भुसावळ- महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शहरात अवैधरीत्या वाळूची वाहतूक सुरू असलीतरी लोकसभा निवडणुकीसाठी तैनात भरारी पथकाने दोन ट्रक जप्त केल्याने अवैध वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. या वाळू वाहतूकदारांना तब्बल पाच लाख रुपये दंडाच्या नोटीसा प्रशासनाने दिल्या आहेत. मंगळवारी पहाटे जॉली पेट्रोल पंपासमोर ट्रक (क्रमांक एम.एच.27- एक्स -3306) व (एम.एच.19 झेड 5603) या वाहनातून अवैधरीत्या वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रत्येकी दोन लाख 48 हजारांचा दंड सुनावण्यात आला. याबाबत नोटीसा बजावण्यात आल्यानंतर हा दंड लवकरच वसूल होणार असल्याचे तहसीलदार महेंद्र पवार म्हणाले. प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर व तहसीलदार मच्छिंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पथकातील महेश सपकाळे आणि पोलिस कर्मचार्‍यांनी ही कारवाई केल्याने अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.