भुसावळ आगाराचा लाचखोर व्यवस्थापक जळगाव एसीबीच्या जाळ्यात

0

आरोपी आगार व्यवस्थापकाला 3 मे पर्यंत सुनावली पोलिस कोठडी ; सोमवारी रात्री उशिरा आगारातच मुसक्या आवळल्याने खळबळ

भुसावळ- भुसावळ आगारातील आगार व्यवस्थापकांना कर्मचार्‍याच्या विभागीय चौकशीचा अनुकूल अहवाल देण्यासाठी एक हजारांची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याची घटना सोमवार, 29 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भुसावळ आगारात घडली. या घटनेने एस.टी.च्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हरीष मुरलीधर भोई, (30, पंधरा बंगला परीसर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भोई यांची ही भुसावळातील पहिलीच पोस्टींग असताना त्यांच्यावर कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भोई यांना मंगळवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 मे पर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

कारवाई न करण्यासाठी मागितली लाच
समजलेल्या माहितीनुसार, आगारातील मेकॅनिक विभागातील एका कर्मचार्‍याकडे अतिरीक्त विभागाचा पदभार असताना त्यांनी दुचाकी लावण्यासाठी जागा नाही तसेच पाण्याची व्यवस्था नाही आदींबाबात आगार व्यवस्थापकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आगारव्यवस्थापकांनी त्यांच्यावर कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण केल्याचा ठपका ठेवत चार्जशीट देण्यासह निलंबनाचा प्रस्तावही तयार केला होता मात्र ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली व तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केल्याचे सूत्रांकडून समजते.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी, पोलिस निरीक्षक गणेश कदम, सहाय्यक फौजदार रवींद्र माळी, पोलिस नाईक मनोज जोशी, सुनील पाटील, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.

लाचखोरांविरुद्ध तक्रार देण्याचे आवाहन
कुठलाही शासकीय अधिकारी वा कर्मचारी तसेच त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी केले असून तक्रारीसाठी भ्रमणध्वनी 9607556556 तसेच दूरध्वनी क्रमांक 0257-2235477 वा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असेही त्यांनी कळवले आहे.