भुसावळ उपनगराध्यक्षपदी शे.सईदा शफी बिनविरोध

0

पुन्हा पालिकेत प्रभारी नगराध्यक्ष नाहीच, विरोधकांच्या दाव्यामुळेच युवराज लोणारींना मिळाली संधी- नगराध्यक्ष रमण भोळे

भुसावळ- भुसावळ पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अखेर नगरसेविका शे. सईदा शफी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी पालिका सभागृहात निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी महेंद्र पवार होते. प्रभाग 11 ब च्या नगरसेविका शे.सईदा शफी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली. या निवडीनंतर सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांनी शे. सईदा यांचा सत्कार केला. दरम्यान, पुन्हा पालिकेत प्रभारी नगराध्यक्ष पद दिले जाणार नसल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगत विरोधकांच्या दाव्यामुळेच युवराज लोणारींना मिळाल्याची कबुली दिली.

शेख सईदा शफी यांची बिनविरोध निवड
पालिकेवर भाजपाने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर पाच वर्षात एक-एक वर्ष नगरसेवकांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्याचे ठरवले होते. पहिल्या वर्षी युवराज लोणारी व नंतर लक्ष्मी मकासरे यांनी पद भूषवले तर मकासरे यांच्या राजीनाम्यानंतर रीक्त पदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. निर्धारित वेळेत सत्ताधारी भाजपच्या शे. सईदा शफी यांचे दोन अर्ज दाखल झाले. सत्ताधारी गट व विरोधी जनआधार विकास पार्टीतून इतर कोणाचाही अर्ज नसल्याने विशेष सभेत शे. सईदा यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा तहसीलदार पवार यांनी केली. व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, गटनेता मुन्ना तेली, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, सभापती रविंद्र खरात, महेंद्रसिंग ठाकूर, सुषमा पाटील, सविता मकासरे, मंगला आवटे आदी उपस्थित होते. निवडीनंतर सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा शे. सईदा शफी यांचा सत्कार केला.

नऊ नगरसेवकांची विशेष सभेकडे पाठ
पालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीप्रसंगी सत्ताधारी गटाचे राजेंद्र नाटकर, सोनी संतोष बारसे, पुष्पा बतरा यांच्यासह तिन्ही स्विकृत नगरसेवकांची गैरहजेरी होती तर जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवक नूरजहॉ खान, संगीता देशमुख, नीलिमा पाटील, मीनाक्षी धांडे, शे. शब्बीर जयाराबी, दुर्गेश ठाकूर यांचीही दांडी होती. जनआधार विकास पार्टीकडून निवडून आलेल्या मात्र सध्या भाजपच्या गोटात असलेल्या नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांचीही अनुपस्थिती होती. सभा सुरू झाल्यानंतर साधना भालेराव व वैशाली चावदस पाटील सभागृहात पोचल्या, यामुळे प्रोसेडींगवर त्यांची स्वाक्षरी नव्हती.

विरोधकांच्या दाव्यामुळे लोणारींना संधी
भुसावळ- असा दावा गत काळात विरोधकांनी केला होता व सुज्ञ शहरवासीयांनाही ही बाब माहित असल्याने भाजपात सर्वच सहकार्‍यांचा सन्मान केला जातो हे दाखवून देण्यासाठी लोणारी यांना आम्ही प्रभारी नगराध्यक्षपदाची संधी दिली होती, अशी भावना नगराध्यक्ष रमण भोळे यांनी उपनगराध्यांच्या निवडीनंतर व्यक्त केली. लोणारींना संधी देण्यामागे विरोधकांच्या वल्गना फोल ठरल्या होत्या व शे. सईदा शफी यांचे पती शे. शफी शे. अजीज हे आमच्या सोबत अनेक वर्षांपासून सोबत असून शहर विकासाच्या कामांमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असतो. भाजप सर्वांना कार्याची संधी देते, आमची एकसंघ टीम असल्याने सर्वांचा योग्य सन्मान केला जातो, अशी प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली.

चांगले काम करून दाखवणार -सईदा शफी
आगामी काळात मात्र प्रभारी नगराध्यक्ष पदासाठी नेत्यांकडे मागणी करू त्यांनी संधी दिली तर या पदावरही चांगले काम करुन दाखवू, अशी भावना नूतन उपनगराध्यक्षा शेख सईदा शफी यांनी व्यक्त केली. माजी मंत्री एकनाथराव खडसे व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासोबत विकासाची कामे करणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.