भुसावळ उपनगराध्यक्ष रमेश नागराणींचा राजीनामा

प्रमोद नेमाडेंना संधी मिळण्याची दाट शक्यता : 29 रोजी निवडणूक

भुसावळ : ठरल्याप्रमाणे भुसावळ पालिकेचे उपनगराध्यक्ष रमेश नागराणी यांनी आपल्या पदाचा नुकताच नगराध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे तर रीक्त जागेसाठी आता 29 एप्रिल रोजी ऑनलाइन पध्दतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पदासाठी नगरसेक प्रमोद नेमाडे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी युवराज लोणारी, शेख सईदा शफी, लक्ष्मी मकासरे यांना उपनगराध्यक्ष पदासाठी संधी मिळाली आहे. शहरात लेवा पाटीदार समाजाचे प्राबल्य अधिक असल्याने प्रमोद नेमाडे यांचे नाव चर्चेत आहे मात्र 29 रोजी त्याबाबत स्पष्ट उलगडा होणार आहे.

पदासाठी सामाजिक समीकरणांचा विचार
रमेश नागराणी यांना दोन महिन्यांसाठी त्यांना 22 जानेवारी रोजी संधी मिळाली तर त्यांचा नुकताच कार्यकाळ संपल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांनी नगराध्यक्षांकडे राजीनामा दिला. पिंटू कोठारी या पदासाठी इच्छूक नसल्याचे समजते तर प्रा.दिनेश राठी यांना यापूर्वी आरोग्य सभापतीची संधी मिळाली आहे. दरम्यान उपनगराध्यक्ष पदासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. 29 एप्रिल रोजी सकाळी दहा ते 12 दरम्यान नामनिर्देशन देणे व स्विकारणे, छाननी, नावाचे वाचन व रारंगणातील नावे वाचून दाखवणे व आवश्यकतेप्रमाणे निवड घेणे असा कार्यक्रम देण्यात आला आहे. ऑनलाइन पध्दतीने ही निवड होईल.