भुसावळ ऑर्डनन्समधील उद्यानातील साहित्याची मनोरुग्णाकडून तोडफोड

0

बिहारमधील संशयीत ताब्यात ; जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट

भुसावळ- आरपीडी रस्त्यावरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाताील साहित्यासह पथदिव्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास घडली मात्र सतर्क सुरक्षा रक्षकाने वेळीच मनोरुग्णाला आवरल्याने अप्रिय घटना टळली. या प्रकरणी राकेशकुमार विनोद पासवान (रा.बिहार) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोरुग्णामुळे उडाली धांदल
ऑर्डनन्स फॅक्टरीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या उद्यानात शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजेनंतर राकेकुमार पासवान हा संशयीत आला व त्याने ऑरेंजसिटी सिक्युरीटी सर्व्हिसेसच्या शेख मुक्तार शेख सत्तार (32, हनुमान मंदिराजवळ, कंडारी) यास ही संपूर्ण जमीन आपली असल्याचे सांगत उद्यानाचा दरवाजा उघडून तेथील पथदिव्यांची काठीने तोडफोड सुरू केली. हा प्रकार पाहताच सुरक्षा रक्षक शेख मुक्तार यांनी आपल्या सहकार्‍यांनी आवाज देत मनोरुग्णास ताब्यात घेतले मात्र त्याने सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्की केली. पहाटेच्या सुमारास मनोरुग्णाला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट
या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाशीही चर्चा केली. शहर पोलिसांना माहिती मिळताच डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. या भागात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाकडून तत्काळ नवीन लाईट लावण्यात आले आहेत.