कोरोना संक्रमणाची साखळी तुटण्यासाठी भुसावळकरांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे
भुसावळ : कोरोनाची संक्रमणाची साखळी तुटण्यासाठी भुसावळात शनिवारी व मंगळवारी दोन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असलातरी व्यापारी व व्यावसायीकांकडून प्रतिष्ठाने काटेकोर बंद ठेवण्यात आली असलीतरी नागरीकांकडून मात्र नियमांना हरताळ फासली जात आहे. विनाकारण नागरीक शहरातील रस्त्यांवर फिरत असल्याचे चित्र असल्याने जनता कर्फ्यूचा उद्देश साध्य होणार कसा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासन व पोलिस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरात आतापर्यंत कोरोना बाधीांची संख्या तबल 830 वर पोहोचली असून तब्बल 59 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. अशा पार्श्वभूमीवर स्वयंशिस्त भुसावळकरांनी पाळणे तितकेच गरजेचे आहे.
केवळ अत्यावश्यक सेवा सुरू
शहरातील कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी आठवड्यातून मंगळवार व शनिवारी दोन दिवस जनता कर्फ्यू पाळला जात आहे. या दिवशी जीवनावश्यक श्रेणीतील भाजीपाला विक्री व किराणा दुकाने तसेच अन्य सर्व व्यावसाय बंद ठेवण्यात येत आहेत तर दुधाची विक्री सकाळी 7 ते 10 व दुपारी 4 ते सायंकाळी 7 या काळातच केली जात आहे शिवाय हॉस्पिटल, मेडिकलची सेवा नियमितपणे 24 तास सुरू ठेवण्यात आली आहे.
पालिका व पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा
जनता कर्फ्यूवर नजर ठेवण्यासाठी पालिकेचे पथक नेमण्यात आले आहे मात्र पथकाकडूनही आता ठोस कारवाई होत नसल्याने व्यावसायीकांचे फावले आहे शिवाय पोलिस प्रशासनाने मरगळ झटकून विनाकारण रस्त्यांवर येणार्यांवर कारवाईची गरज आहे मात्र तसे होत नसल्याने नागरीकांचा मोठ्या प्रमाणावर शहरात वावर वाढला आहे ही बाब शहरासाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे.
भुसावळकरांना स्वयंशिस्तीची गरज
शहरात सोमवारपर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या तब्बल 830 वर पोहोचली होती तर त्यातील 59 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे शिवाय 522 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. भुसावळातून कोरोना हद्दपार करण्यासाठी भुसावळकरांनी स्वयंशिस्त पाळणे काळाची गरज आहे. पोलिस व प्रशासनाने या संदर्भात गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.