भुसावळ । दिवसभर मंदिरात बसून पूजेसह साफ-सफाईसह गाणे, अभंग म्हणून भाविकांची करमणूक करणार्या पुजार्याचाच हनुमानाच्या मंदिरात सोमवारी पहाटे झालेल्या खुनाने शहरातील गरूड प्लॉट भागातील नागरिकही सुन्न झाले आहेत. खून प्रकरणी पाच संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे तर घटनास्थळावरून खुनासाठी वापरलेले लाकडी ओंडके व रक्ताचे नमूने जप्त करण्यात आले.
अभंगामुळे विजय ठाकूर सर्वांनाच परीचित
शहरातील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी असलेल्या विजय लक्ष्मण ठाकूर (53) या अविवाहित व चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण झालेल्या इसमाच्या डोक्यावर गेल्या पाच वर्षांपूर्वी कुठल्यातरी कारणावरून परिणाम झाल्याने त्यांनी घर सोडले मात्र अशा स्थितीतही त्यांच्यातली देवभक्ती मात्र जागी असल्याने ते जामनेर रोड भागातील बहुतांश मंदिरांमध्ये जावून वेळ-प्रसंगी पूजेसह स्वच्छताही करीत असल्याने भाविकांना ते परिचितही होते. भाविकांच्या आग्रहाखातर ते एखादा अभंग व गाणेही म्हणत असल्याने लोक आवडीने त्यांना प्रतिसाद देत काहीशी आर्थिक मदतही देत होते.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
ठाकूर यांच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी तापी नदीवरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ व दोन बहिणी असा परीवार आहे.