भुसावळ : वाढदिवसाच्या पार्टीतच वाद झाल्याने मित्राची लोखंडी पावडा व धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना जामनेर रोडवरील गजानन महाराजांच्या मंदिरासमोर शुक्रवारी मध्यरात्री घडली होती. या घटनेत सचिन ज्ञानदेव भगत (32, श्रद्धा नगर, भुसावळ) या तरुणाचा खून झाला होता. खून प्रकरणी आरोपी प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (29, पंढरीनाथ नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली होती. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, खून प्रकरणी अन्य दोन पसार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक कृष्णा भोये, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक हरीष भोये, रवींद्र बिर्हाडे, दीपक जाधव, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, योगेश माळी, किशोर मोरे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, परेश बिर्हाडे आदींच्या पथकाने आरोपी मुन्ना चौधरी यास साकेगाव शिवारातील जय जवान पेट्रोल पंपाच्या पाठीमागून अटक केली.
चौघांविरोधात खुनाचा गुन्हा
सचिन भगत या तरुणाच्या खून प्रकरणी मयताची पत्नी सपना सचिन भगत (26, श्रद्धा नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुन्ना चौधरी, राहुल कल्ले, जितू पावरा व अन्य इसमाविरोधात बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, खुनातील दोन संशयीत आरोपींचा शोधासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी दोन पथके नियुक्त केली आहे. त्यात समाधान पाटील, प्रशांत परदेशी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील आदींचा समावेश आहे.