भुसावळ गँगवार : सीआयडी चौकशीची मागणी करणार -रामदास आठवले

0

एकाचवेळी निघाल्या पाच जणांच्या अंत्ययात्रा : मन हेलावणारा आक्रोश

भुसावळ : भुसावळातील भाजपा नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचा मुलगा रोहित उर्फ सोनू, मुलगा प्रेमसागर तसेच मोठे बंधू सुनील बाबूराव खरात (48) व खरात भावंडांचा मित्र सुमित संजय गजरे यांची रविवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. सोमवारी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री साडेसात वाजेच्या सुमारास समता नगरातील घरापासून एकाचवेळी सजवलेल्या वाहनातून पाचही जणांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेसमयी हजारो समाजबांधवांसह नागरीकांचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, रात्री उशिरा एकाचवेळी पाचही जणांवर यावल रस्त्यावरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीआयडी चौकशीची मागणी करणार -रामदास आठवले
अंत्ययात्रेसमयी जलसंपदा मंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. याप्रसंगी संतप्त जमावाने व नातेवाईकांनी न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी ही घटना सूड बुद्धीतून झाली असल्याचे सांगत या घटनेतील आरोपींच्या मागे कुठल्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीचा हात आहे का? या संदर्भात सीआयडी चौकशीची मागणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. अंत्ययात्रेत आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, रमेश मकासरे, राष्ट्रवादीचे उमेदवार जगन सोनवणे यांच्यासह शहरातील विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

मृतदेह पाहताच कुटुंबियांचा टाहो
एकाचवेळी पाचही जणांची निर्घृण हत्या झाल्यानंतर कुटुंबीय दुःखाच्या डोंगरात असताना सोमवारी सायंकाळी पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदन करून आणल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह पाहताच मोठ्या प्रमाणावर आक्रोश केला. यावेळी अनेकांना गहिवरूनही आले.

मार्केट सुरळीत : शाळा-महाविद्यालयांना अघोषित सुटी
भुसावळात एकाचवेळी पाच जणांचा निघर्र्ृण खून झाल्यानंतर शहरासह राज्यात खळबळ उडाली आहे. सोमवारी शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर त्यामुळे परीणाम जाणवला. शहरातील काही प्राथमिक शाळांना दुपारी सुटी असल्याचे सांगून विद्यार्थ्यांसह पालकांना माघारी पाठवण्यात आले. शहरातील मार्केटमध्ये मात्र नियमित व्यवहार सुरू असल्याने या घटनेचा फारसा परीणाम जाणवला नसल्याचे दिसून आले.