पत्नीच्या फिर्यादीनुसार गुन्हा ; गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता
भुसावळ- शहरातील दहा बंगला भागातील रेल्वे कर्मचार्यावर गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघड झाली. या प्रकरणी जखमी कर्मचार्याच्या पत्नीने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी आरोपीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याकूब डॅनियल जॉर्ज (37) असे जखमी कर्मचार्याचे नाव आहे. दरम्यान, गोळीबार प्रकरणी जखमीचा चुलत शालक बॉबीसिंग विरेंद्रसिंग ठाकूर (44) याला अटक करण्यात आली असून त्यास गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे तर या घटनेत आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले. दरम्यान, गोळीबार नेमका कशामुळे झाला? याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
शस्त्रक्रियेनंतर बाब उघड
रेल्वेच्या दहा बंगला भागातील कालिवाडी मंदिरासमोरील डी.368 मधील रहिवासी व रेल्वेत कर्मचारी असलेले याकूब डॅनियल जॉर्ज (37) यांच्यावर सोमवारी कुणीतरी गोळीबाळ केल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले असतानाच त्यांचा मित्र त्यांना भेटण्यासाठी घरी आल्यानंतर त्यांनी तत्काळ जखमीला मंगळवारी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेतच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या डोक्यातून पिस्तूलाची गोळी काढण्यात आल्यानंतर वैद्यकीय सूत्रांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.
पोलिस अधीक्षकांची धाव
भुसावळात पुन्हा गोळीबार झाल्याची माहिती कळताच पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम, डीवायएसपी गजानन राठोड, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले, उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी आदींनी घटनास्थळी भेट दिली. मंगळवारी रात्री 10.45 वाजता जॉर्ज यांच्या निवासस्थानाची पोलिसांनी घर झडती घेतल्यानंतर त्यांना गोळीची रीकामी पुंगळी सापडली. ती पोलिसांनी जप्त असून प्रयोगशाळेत ती तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणी जखमीचा चुलत शालक बॉबीसिंग विरेंद्रसिंग ठाकूर (44) याला अटक करण्यात आली असून त्यास गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.