भुसावळात गावठी कट्ट्याच्या धाकावर किराणा व्यापार्‍याला लुटले

0

गोळीबार झाल्याचीही चर्चा : चौघांविरुद्ध गुन्हा : पसार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध

भुसावळ (गणेश वाघ) : किराणा व्यावसायीकाशी झालेल्या वादातून चौघांनी हवेत गोळीबार केल्याची घटना शहरातील शनी मंदिर वॉर्ड परीसरात रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडल्याचे बोलले जात होते मात्र तपासाअंती आरोपींनी गावठी कट्टा दाखवत तक्रारदाराला धमकावल्याची बाब पुढे आली असून गोळीबार झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी चौघा आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघे आरोपी निष्पन्न
शनी मंदिर वॉर्डातील एका किराणा व्यावसायीकाजवळ सिगारेट मागितल्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घातला तसेच कुविख्यात आरोपीने आपल्या जवळील गावठी कट्ट्याचा धाक दाखवत किराणा व्यावसायीकाचा मोबाईल लांबवला तर सुरुवातीला या घटनेत गोळीबार झाल्याची चर्चा असलीतरी पोलिस तपासात मात्र गावठी कट्टा दाखवून लुट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गोळीबार झाल्याच्या चर्चेनंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला होता. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक राठोड म्हणाले की, गोळीबार झाला वा नाही? याची खातरजमा आम्ही करीत असून तक्रारदाराकडून नेमकी घटना जाणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.