भुसावळ ग्रामीणमधील पाणी प्रश्‍न मार्गी

0

आमदार संजय सावकारे यांचे हस्ते जलवाहिनीचे भूमिपूजन ; कामाला सुरूवात

भुसावळ- शहराच्या महामार्गापलिकडे असलेल्या पंढरीनाथ नगर, तुकाराम नगर, स्वामीनारायण मंदिर परीसर, पूजा कॉम्लेक्समागील भागाचा ग्रामीण भागात समावेश असल्याने या भागात नगरपालिका प्रशासनाला सुविधा पुरवणे शक्य नाही. परीणामी या भागातील नागरीकांना मुलभूत सुविधापासुन वंचित रहावे लागत होते. या भागातील रहिवाशांना सर्वाधिक पाणीप्रश्‍न भेडसावत होता. यावर उपाय म्हणून काही रहिवाशांनी खासगी कुपनलिकांचा आधार घेतला होता मात्र उन्हाळयात भुगर्भातील पाण्याची पातळी खालावत असल्याने या परीसरातील नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.

अनेक वर्षांच्या मागणीला यश
पाण्याच्या अभावामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांनी वारंवार प्रांताधिकारी यांना निवेदन देवून उपोषणही केले होते. यामुळे या भागाचा पाणी प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पंचायत समितीच्या पाणीटंचाई निधीत समावेश करण्यात आला होता. पाणीटंचाई निधीला तातडीने मंजुरी मिळाल्याने खडका ग्रामपंचायत आणि एक खासगी कुपनलिकेवरून या भागात पाणी पुरवण्यासाठी जलवाहिनीच्या कामाचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन करण्यात आले. यामुळे या भागातील नागरीकांची अनेक वर्षापासून होणारी मागणी पुर्णत्वास आली आहे.

यांची होती उपस्थिती
आमदार संजय सावकारे यांच्यासह नगरपालिकेचे गटनेते मुन्ना तेली, संजय पाटील, पंचायत समितीचे पाणीपुरवठा शाखा अभियंता एस.पी.लोखंडे, ज्ञानेश्‍वर आमले यांच्यासह परीसरातील नागरीक उपस्थित होते.