आमदारांच्या प्रयत्नातून ग्रामीण रस्त्यांसाठी आठ कोटींचा निधी
भुसावळ- आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील वाढीव वस्त्या, महसूल विभागाकडे येणार्या भागातील रस्ते लवकरच कात टाकणार आहेत. रस्ता कामांसह अन्य कामांसाठी सहा कोटी 28 लाखांचा विकास निधी मंजूर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली.
या विकासकामांचा समावेश
तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील स्मशानभूमीत बैठक व्यवस्था, ओझरखेडा, बेलखेडा येथे रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पिंपळगावात वाचनालय बांधकाम, कठोरा बुद्रूक, मोंढाळा येथे सामाजिक सभागृह, बोहर्डी खुर्दमध्ये स्मशानभूमी बांधकाम, खडके येथे सभागृहाजवळ पेव्हर ब्लॉक बसवणे अशी सुमारे 67 लाख 26 हजारांची कामे सहा महिन्यांत पूर्ण होणार आहेत. वराडसीम, फुलगाव, ओझरखेडा व साकरी येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 66 लाख 79 हजार, तळवेल येथे रस्ता डांबरीकरण, पिंपळगाव बुद्रूक अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, स्वामी नारायण मंदिरा मागील भागात रस्ता डांबरीकरण, खडका येथे अंतर्गत 1 किमी. रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण, गणपती नगर, वृंदावन नगर, सुमूख बंगलोज येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, भुसावळ येथील चिकुचा मळा, गणराय विहारात अंतर्गत रस्ते डांबरीकरण, साकेगावातील गणपती नगर, ठोके नगरात रस्ते डांबरीकरणासाठी 1 कोटी 11 लाख 78 हजार खर्च अपेक्षित आहे. वरणगाव ते दर्यापूर 1.99 किमी रस्त्यासाठी एक कोटी 17 लाख 90 हजार, जोगलखेडा नवे ते भानखेडा रस्ता 59 लाख 30 हजार, प्रजिमा ते जोगलखोरी रस्ता (2 किमी.) 1 कोटी 16 लाख 46 हजार खर्चातून कामे होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.