आमदार संजय सावकारेंच्या प्रयत्नानतून सव्वा दोन कोटींचा निधी मंजूर
भुसावळ:– तालुक्यातील ग्रामीण भागासह प्रांताधिकार्यांच्या अखत्यारीत येणार्या अनेक रस्त्यांचा डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून त्यासाठी तब्बल सव्वा दोन कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरच हे रस्ते कात टाकणार आहेत. ग्रामविकास राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आमदार संजय सावकारे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या रस्त्यांच्या कामांना 9 रोजी मंजुरी मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सूचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे या योजनेंतर्गत या कामांना मंजुरी मिळाली आहे.
या रस्त्यांच्या कामांना मिळाली मंजुरी
भुसावळ ग्रामीणसह पालिकेच्या हद्दीत न येणार्या मात्र प्रांताधिकार्यांच्या अखत्यारीत येणार्या रस्त्यांची दुरवस्था गेल्या अनेक वर्षांपासून झाल्यानंतर त्याबाबत दखल घेतली जात नसल्याने नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती मात्र आमदार सावकारेंनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये साकरी फाटा ते साकरी, वांजोळा-गोजोरा, सुनसगाव-वराडसीम, भिलमळी स्मशानभूमी रस्ता, किन्ही ते वेल्हाळा, सुसरी ते वेल्हाळा, बोहर्डी ते तळवेल, कंडारी ते खडका सूतगिरणी, भुसावळ नगरपालिका हद्दीबाहेरील विवेकानंद कॉलनी अंतर्गत रस्ते मजबुतीकरण तसेच डांबरीकरण, भुसावळ पालिका हद्दीतील नारायण नगर, सोमेश्वर नगरातील अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण, साकेगाव शिवारातील क्रीडा संकुलाकडे जाणार्या रस्त्याचे बांधकाम, मजबुतीकरण व डांबरीकरण आदी कामे होणार आहेत.
लवकरच कामांना सुरुवात -आमदार संजय सावकारे
शहराला जोडणार्या अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली होती मात्र रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच कामांना सुरुवात होईल विशेष म्हणजे पालिका वा ग्रामीणमध्ये न मोडणार्या मात्र प्रांताधिकार्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांची कामेही मंजूर झाल्याने नागरीकांना निश्चित दिलासा मिळेल. ग्रामविकास राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे त्यासाठी पाठपुरावा करण्यात आल्याने त्यांनी निधी मंजूर केला असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले.