भुसावळ : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय प्रवाशांना दिलासा देत भुसावळ जंक्शनवरून शुक्रवारी पुन्हा 748 प्रवाशांना घेवून 01850 श्रमिक एक्स्प्रेस गोरखपूरसाठी सोडण्यात आली. सुमारे दिड महिन्यांपासून भुसावळसह जळगाव, धुळे तसेच बुलढाणा भागात अडकलेल्या परप्रांतीय प्रवाशांना या गाडीमुळे मोठा दिलासा मिळाला.
जंक्शनवरून दुसर्यांदा सुटली गाडी
बुधवार, 6 मे राजी प्रथमच भुसावळ रेल्वे स्थानकावर लखनऊसाठी गाडी सोडण्यात आली होती तर शुक्रवार, 15 मे राजी पुन्हा परप्रांतीय प्रवाशांना गोरखपूर जाण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन रवाना करण्यात आली. तत्पूर्वी बुलढाणा, धुळे आणि जळगाव जिल्ह्याून परप्रांतीय मजुरांना वाहनांद्वारे भुसावळात आणण्यात आले सायंकाळी त्यांना रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करून रेल्वे स्थानकात आणण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्याच्या उपस्थितीत आलेल्या सर्व परप्रांतीयांची हजेरी घेण्यात आली तर प्रवाशांना प्रवासाची तिकीटे शासनाकडून काढून देण्यात आली.
यांनी राखला चोख बंदोबस्त
रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाचे वरीष्ठ आयुक्त क्षितीज गुरव, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, भुसावळ शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, जीआरपी निरीक्षक दिनकर डंबाळे, आरपीएफ निरीक्षक दिनेश नायर आदींनी बंदोबस्त चोख ठेवला होता. दरम्यान, यावेळी स्टेशन संचालक जी.आर.अय्यर तसेच रेल्वे अधिकारी व कर्मचारी आदींचीही उपस्थिती होती.
नोदंणी 1763 प्रवाशांची मात्र 748 प्रवासी दाखल
सूत्रांच्या माहितीनुसार, एक हजार 763 प्रवाशांनी गोरखपूरसाठी नोंदणी केली होती मात्र शुक्रवारी दुपारपर्यंत केवळ 748 प्रवासी दाखल झाल्याने त्यांना रवाना करण्यात आले. शुक्रवारी 6.45 वाजता गोरखपूरकडे गाडी रवाना झाला.